सुधीर भाऊ एकनाथ शिंदेंना म्हणाले तुम्ही तर सीएम…

विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सभागृहात उपस्थित होते. काय झाले मग पुढे? नक्की वाचा...

एकनाथ शिंदे… शिवसेनेमधील एक दबंग नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री. विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा देखील रंगली होती. मात्र आज सभागृहात चक्क भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदे यांना, तुम्ही तर सीएम मटेरियल असल्याचे म्हटले. विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सभागृहात उपस्थित होते.

(हेही वाचाः स्वा. सावरकरांसाठी साधं एक ट्वीटही नाही, संभाजीनगरचाही पडला मुख्यमंत्र्यांना विसर- फडणवीस!)

यवतमाळच्या आर्णी येथील गैरव्यवहार प्रकरणात एका सरकारी अधिकाऱ्याला राज्य सरकारकडून वाचवण्यात येत असल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला. जवळपास १५ महिने उलटून सुद्धा या अधिकाऱ्याची चौकशी झालेली नाही. त्याच्यावर निलंबनाची कारवाईही झालेली नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटले. त्यावर एकनाथ शिंदे यांनी सरकार कोणालाही पाठिशी घालत नाही. चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हटले की, तुमच्यात मुख्यमंत्री होण्याची(सीएम मटेरियल) क्षमता आहे. त्यामुळे एखाद्या राज्यमंत्र्याप्रमाणे वागू नका, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.

आमदाराची गॅलरीतून उडी मारण्याची धमकी

दरम्यान भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे निलंबन करावे नाहीतर विधानसभेच्या गॅलरीतून उडी मारेन अशी धमकी आमदार डॉ.संदीप धुर्वे यांनी दिली. यानंतर विधानसभेत एकच गोंधळ उडाला. सत्ताधारी महाविकास आघाडीचे आमदार आणि विरोधी पक्षाचे आमदार यांच्यात घोषणाबाजी झाली. संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना विनंती केली की, सदस्य सभागृहात आत्महत्येची धमकी देत आहेत, हे योग्य नाही असे म्हटले.

(हेही वाचाः भाजप आमदार सभागृहात करू लागले म्याव… म्याव…!)

त्या अधिकाऱ्याची चौकशी होणार

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ दिवसांत चौकशी पूर्ण करुन अधिकारी दोषी असल्यास निलंबन केलं जाईल, असे उत्तर दिले आहे. मात्र अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन केले गेले पाहिजे, असा मुद्दा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार संदीप सुर्वे यांनी उपस्थित केल्याने विधानसभेत गोंधळ सुरू झाला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here