महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला आता दीड वर्ष पूर्ण होत आहे. सरकार स्थापन होताच काही महिन्यांतच कोरोना सारख्या भीषण संकटात सापडलेल्या महाराष्ट्राला बाहेर काढणं हे ठाकरे सरकारपुढे फार मोठे आव्हान होते. या आव्हानाचा ‘सामना’ करताना विरोधकांनी अनेकदा सरकारला धारेवर धरले. त्यामुळे सरकार स्थापन झाल्यापासूनच विरोधकांच्या प्रत्येक कृतीमागे सरकार पाडण्याचा हेतू आहे, असे ठाकरे सरकारचे म्हणणे आहे. पण हे सरकार त्यांच्या कर्मानेच पडेल, असे म्हणणा-या भाजपकडून आता सरकार पाडण्यासाठी खरंच प्रयत्न सुरू झाले आहेत का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या चर्चेला कारण आहे ते म्हणजे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे सूचक ट्वीट.
काय आहे मुनगंटीवारांचे ट्वीट?
कायमच ठाकरे सरकारला आपल्या तिखट वाग्बाणांनी घायाळ करणा-या सुधीरभाऊंनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही सरकारवर टीका करुन सभागृह दणाणून सोडले. त्यांचा तो आवेश पाहून खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांना नटसम्राट म्हणत कोपरखळी काढली होती. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तर त्यांच्यासाठी सभागृहात थेट गझल गायली. पण आता सुधीरभाऊंनी एक ट्वीट केल्याने भाजपकडून नक्की कुठले प्रयत्न सुरू आहेत, त्याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. असं अन्यायकारक सरकार टिकवणं हे राजकीय दृष्टीने आमच्याकडून घोडचूक होईल, असं ट्वीट मुनगंटीवार यांनी केलं आहे. त्यामुळे या ट्वीटमधून ते नेमकं काय सूचवायचा प्रयत्न करत आहेत, त्याचे तर्क-वितर्क राजकीय वर्तुळात काढण्याचे प्रयत्न आता चालू झाले आहेत.
असं अन्यायकारक सरकार टिकवणं हे राजकीय दृष्टीने आमच्याकडून घोडचूक होईल.. pic.twitter.com/nhC1SmEOyj
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) March 13, 2021
(हेही वाचाः अधिकाऱ्यांमुळे ठाकरे सरकारची बदनामी होत आहे का?)
काळ देईल उत्तर
आजवर भाजप सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे, असं कायमंच ठाकरे सरकारकडून बोलले जाते. पण भाजपने मात्र आपल्याला पाडापाडीच्या राजकारणात काहीही रस नाही, अशी आपली भूमिका ठेवली आहे. पण आता सुधीरभाऊंच्या या ट्वीटने एक वेगळाच ट्वीस्ट महाराष्ट्राच्या राजकारणात आल्याचे बोलले जात आहे. सरकार पाडण्यासाठी भाजपने आता प्रत्यक्ष प्रयत्न तर सुरू केले नाहीत ना, असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. त्यामुळे आता या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय, हे येणारा काळच ठरवेल.