एनसीपीच्या मंत्र्यांचा निकटवर्ती असलेला आणि क्रूझ पार्टीवर कारवाईचे षडयंत्र रचणारा सुनील पाटील याने वर्षभरापूर्वी काही महिन्यांसाठी हॉटेल ललितमध्ये एक सूट बुक केला होता. तिथे शराब, शबाब आणि कबाबच्या पार्ट्या व्हायच्या, त्यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची कायम हजेरी असायची. मंत्री नवाब मलिक हे देखील इथे येऊन मजा मारायचे. इथेच बदलीचे रॅकेट चालायचे, डील व्हायच्या, असा गौप्यस्फोट भाजपचे नेते मोहित भारती यांनी केला.
ललित हॉटेलमध्ये कोणकोणते मंत्री यायचे?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांच्याही सुनील पाटीलसोबत हॉटेल ललितमध्ये कायम भेटी व्हायच्या, तिथे आणखी कोणते मंत्री यायचे, कोणत्या डील व्हायच्या, याचा खुलासा आता एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी करावा. ते उद्या हॉटेल ललितमधील भांडाफोड करणार आहेत, तर आता याचीही उत्तरे देऊन बॉम्ब फोडावेत, असे आव्हान भारती यांनी दिले. एनसीपीचे मंत्री नवाब मलिक यांना २-३ ग्रॅम अमली पदार्थांचे सेवन आक्षेपार्ह वाटत नाही. हे दुर्दैवी आहे. तेवढेच अमली पदार्थ सेवन करून तरुणाई व्यसनाधीन बनत आहे. त्यांची स्टेट फॉर ड्रग्स ही मोहीम सुरु आहे का?, असाही प्रश्न भारती यांनी विचारला.
वसुलीचा मेगा प्लॅन
क्रूझवरील कारवाई, त्यामधून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करणे, त्यानंतर एका बाजूने शाहरुख खानकडून आर्यनला सोडवण्यासाठी २८ कोटींची वसुली करायची, दुसरीकडे ही कारवाई चुकीची असल्याचे सांगत भाजपाला बदनाम करायचे, एनसीबीच्या अधिकाऱ्याला बदनाम करायचे आणि त्याच बरोबर ड्रग्सच्या धंद्याला सुरक्षित करायचे असा मेगा प्लॅन यामागे रचण्यात आला होता, असेही भारती यांनी सांगितले.
क्रूझवरील कारवाईचा सूत्रधार सुनील पाटील!
क्रुझवरील ड्रग्सच्या पार्टीवरील कारवाई हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच षडयंत्र होते, त्यामागील प्रमुख सूत्रधार हा एनसीपीच्या मंत्र्यांच्या जवळचा २० वर्षांपासूनचा एनसीपीचा माणूस असलेला सुनील पाटील हा आहे. किरण गोसावी, सॅम डिसुझा, प्रभाकर साईल हे सर्व जण पाटीलचीच माणसे आहेत, महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी, एनसीबीच्या अधिकाऱ्याला बदनाम करण्यासाठी, भाजपाला बदनाम करण्यासाठी, ड्रग्सच्या धंद्याला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीने हा प्लॅन तयार केला, असा गंभीर आरोप भारती यांनी केला.
Join Our WhatsApp Community