सनराईस हॉस्पिटल आग : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा! भाजपची मागणी!

वैद्यकीय अधिकारी आरोग्य ‘एस’ विभाग यांनी सनराईस हॉस्पिटलला नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तसेच अग्निशमन दल अधिकारी यांनी ना हरकत प्रमाणपत्रही दिले, असे कळविले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे, असे भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे म्हणाले.

100

भांडुप पश्चिम एलबीएस मार्ग येथील सनराईस हॉस्पिटलमध्ये गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता लागलेल्या आगीमध्ये दहा जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेला महापालिका प्रशासन जबाबदार आहे. या प्रकरणी अनधिकृत सनराईस हॉस्पिटलला परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपने पत्रकार परिषदेत केली.

कोविडचा फायदा घेत सुरू केले रुग्णालय!

सनराईस रुग्णालयाला नियमानुसार महापालिका परवानगी देत नव्हती. याआधी अग्निशमन दलाने ना हरकत प्रमाणपत्र दिले नव्हते. विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे मॉलमध्ये वापरात बदल करून रुग्णालय सुरू करता येत नाही. अशा वेळी हे रुग्णालय अनधिकृतच ठरते, असे सांगत भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी हे रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक कायदा-नियम, अटी व शर्तीचे कुठलेही पालन न करता हे रुग्णालय उभारले गेल्याचा आरोप केला. या रुग्णालयास परवानगी मिळत नसताना कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढला आणि लॉकडाऊन झाले. या संधीचा फायदा घेत प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्यासाठी या खासगी रुग्णालयास विशेष बाब म्हणून कोविड रुग्णालय अशी परवानगी महापालिकेच्या ‘एस’ विभागाने राजकीय दबावापोटी दिली. त्याची परिनीती दहा रुग्णांचे नाहक प्राण जाण्यात झाली, असा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला.

(हेही वाचा : ड्रीम मॉल आगीच्या चौकशीचे आदेश, मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत!)

रुग्णालयाविरुद्ध तक्रार करूनही राजकीय दबावापोटी दुर्लक्ष!

सनराईस रुग्णालयात आग लागल्यानंतर तिथे अग्निशमन यंत्रणा कार्यरत नव्हती. अग्निशमन दल तिथे पोहोचल्यानंतर त्यांना रुग्णालयापर्यंत जाण्यास बरेच अडथळे असल्यामुळे आग विझवण्यासाठी खूप उशीर झाला. सनराईस रुग्णालय हे खासगी रुग्णालय असल्याने रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा देयके घेतली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या रुग्णालयाबाबत स्थानिक भाजपा नगरसेविका साक्षी दळवी यांनी वारंवार तक्रार करूनही त्याकडे राजकीय दबावापोटी दुर्लक्ष करण्यात आले. या तक्रारीला लेखी उत्तर देताना वैद्यकीय अधिकारी आरोग्य ‘एस’ विभाग यांनी सनराईस हॉस्पिटलला नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तसेच अग्निशमन दल अधिकारी यांनी ना हरकत प्रमाणपत्रही दिले, असे कळविले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तरी या अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.

भाजपचा सभात्याग!

भाजपचे प्रवक्ते व नामनिर्देशित नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी या रुग्णालयाला राजकीय दबावापोटी अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याचे सांगत ही गंभीर घटना असून महापालिकेवरील विश्वास उडवणारी घटना असल्याचेही स्पष्ट केले. राजकीय दबावापोटीच ही परवानगी मिळाली असून विक्रोळी व भांडुपमधील हेच रुग्णालय सुरु करण्यासाठी तेच जबाबदार असल्याचे सांगितले. तसेच या घटनेतील १० मृतांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सुधार समितीत भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत आणि अतुल शहा तसेच स्थापत्य शहर समितीत मुद्दा उपस्थित करण्याची मागणी केली. परंतु दोन्ही अध्यक्षांनी भाजपच्या सदस्यांना बोलू दिले नाही. त्यामुळे भाजपने सभात्याग केला. त्यामुळे या दोन्ही अध्यक्षांचा भाजप निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.