३० वर्षे सेवेत आहात तरी अविश्वास! सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंगांची याचिका फेटाळली!

एका महासंचालक पदाच्या अधिकाऱ्यावर दबाव आणला जातोय, या आरोपात कसे तथ्य असू शकते? असे असेल तर अन्य अधिकाऱ्यांचा विचारच न केलेला बरा, उगाच दबावाच्या कहाण्या रचू नका, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.   

79

तुम्ही महाराष्ट्र कॅडरचे पोलिस अधिकारी आहात. तिथे ३० वर्षे तुम्ही सेवा देत आहात तरीही तुमचा तुमच्याच व्यवस्थेवर अविश्वास कसा असू शकतो, हे धक्कादायक आहे, असे सांगत तुमच्यावर जे एफआयआर दाखल आहेत, त्यावर स्थानिक न्यायालय पाहिल, आम्ही त्याकडे लक्ष देणार नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची याचिका फेटाळून लावली.

उगाच दबावाच्या कहाण्या रचू नका!

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांच्या विरोधातील सर्व चौकशा महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र संस्थेकडे सोपवाव्यात, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती वी.रामसुब्रमण्यम यांच्यासमोर सुनावणी झाली. एका महासंचालक पदाच्या अधिकाऱ्यावर दबाव आणला जातोय या आरोपात कसे तथ्य असू शकते, असे असेल तर अन्य अधिकाऱ्यांचा विचारच न केलेला बरा, उगाच दबावाच्या कहाण्या रचू नका.  तुमच्यावर दाखल असलेल्या सगळ्याच गुन्ह्याविषयी आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. त्यासाठी स्वतंत्र न्यायालये आहेत. आम्ही तुमची याचिका फेटाळत आहोत. तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयात जायचे आहे तिथे तुम्ही जाऊ शकता, अशा शब्दात न्यायालयाने सिंह यांना फटाकारले.

(हेही वाचा : शिखांना भडकवण्याचं ‘इस्लामी’ कारस्थान… कोण आहे यामागचं पाकिस्तानी ‘प्यादं’?)

परमबीर सिंह हे १९८८ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असून मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरून त्यांना १७ मार्च रोजी काढून टाकण्यात आले होते. नंतर त्यांना महाराष्ट्र राज्य गृहरक्षक दलाचे जनरल कमांडर पद देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार व गैरवर्तनाचा आरोप केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने नंतर सिंह यांनी देशमुख यांच्या विरोधात केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यामुळे देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामाही दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.