महाराष्ट्रात घडलेल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात १ ऑगस्टला होणारी सुनावणी बुधवार, ३ ऑगस्टला होणार आहे. या सुनावणीकडे राज्यासह साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ हतबल; कंत्राटदारांचा मनमानी कारभार )
३ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यात अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडल्या. यातून मूळ शिवसेना विरुद्ध शिंदे गट असे दोन गट आमने सामने उभे ठाकले. त्यात दोन्ही गटांनी शिवसेना आमचीच असा दावा केला. त्यामुळे पक्ष आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह यावरील दाव्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यावरून पुढे हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. त्याआधीच्या घडामोडींमध्ये शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई, विधानसभा अध्यक्ष, विधिमंडळ नेते आणि प्रतोद निवड, राज्यपालांनी शिंदे-फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी दिलेली अनुमती, निवडणूक आयोगाच्या नोटिसीला स्थगिती आदी विषयांवर दोन्ही गटांनी परस्परांविरोधात केलेल्या याचिका प्रलंबित आहेत. या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. मात्र आता ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
( हेही वाचा : संजय राऊतांना अटक होणार? दादरच्या घरीही छापा)
दोन आठवड्यापूर्वी या प्रकरणावर सुनावणी झाली होती. त्यावेळी ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी, तर शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला होता.
Join Our WhatsApp Community