केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव दिल्यानंतर, ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तातडीने यावर सुनावणी व्हावी, अशी ठाकरे गटाची मागणी होती. परंतु, आता सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने ठाकरेंच्या याचिकेवर 22 फेब्रुवारीला सुनावणी होणार असल्याचे सांगितले आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुढचे तीन दिवस सलग केली जाणार आहे. शिंदे आणि ठाकरे गटाच्या दोन्ही बाजूचे वकिल 21 फेब्रुवारीपासून तीन दिवस युक्तिवाद करणार आहेत. याचदरम्यान, आता ठाकरे गटाच्या याचिकेवर 22 फेब्रुवारीला दुपारी 3:30 वाजता सुनावणी घेणार असल्याचे घटनापीठाने सांगितले आहे. मागच्या आठवड्यात सलग तीन दिवस झालेल्या सुनावणीत 16 आमदार अपात्रतेचा मुद्दा, विधानसभा अध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव यांसह उद्धव ठाकेर यांचा राजीनामा याविषयी युक्तिवाद पार पडला होता.
( हेही वाचा: उद्धव ठाकरेंना बळीचा बकरा बनवले; भगतसिंह कोश्यारींची टीका )
राज्यातील सत्तासंघर्षाच्या पाश्वभूमीवर सर्व याचिका एकत्रित करुन पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु आहे. हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठीकडे जावे, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. मात्र, हे संपूर्ण प्रकरण आता पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोरच होणार आहे. यामध्ये सर्वात कळीचा मुद्दा हा 16 आमदार अपात्र होणार आहेत का? यासाठी नेमका काय युक्तिवाद पुन्हा केला जाईल याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून आहे.