महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयात तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवरून घमासान चर्चा झाली. खुद्द सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राज्यपालांनी त्या वेळी घेतलेल्या निर्णयांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे सध्या सर्वोच्च न्यायालय या सत्तासंघर्षाच्या प्रकरणात काय निकाल देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच सर्वोच्च न्यायालय हा एकमेव आशेचा किरण असल्याचे प्रतिपादन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
बुधवारी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीतून महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थितीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘सध्या न्यायालयात लढाई सुरू आहे. मला देवावर, न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. मी अनेकदा म्हटले आहे, लोकशाहीचे जे चार स्तंभ असतात, त्या चारही स्तंभापैकी तिघांची तर वाट लागलीच आहे. त्यातला महत्त्वाचा स्तंभ असतो माध्यम. दरम्यान पत्रकारांच्या हातामध्ये नेहमी कलम असायला पाहिजे, पण आजकालच्या पत्रकारांच्या हातामध्ये कमळ आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये एक आशेचा किरण बसला आहे. ते म्हणजे सर्वोच्च न्यायालय.’
‘न्यायदेवता तिच्या डोळ्यावरती पट्टी असते. तिच्या डोळ्यावरची पट्टी वेगळी आणि ध्रुत राष्ट्रासमोर जे काही वस्त्रहरण झालं होत ते वेगळे. त्यामुळे मला खात्री आहे, जरी न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पट्टी असली तरी ती आपल्या देशातील लोकशाहीचे वस्त्रहरण करू देणार नाही,’ असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
(हेही वाचा – आमदार-खासदारांची पेन्शन लगेच बंद करा – बच्चू कडू)
Join Our WhatsApp Community