परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. पण सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयाचा रस्ता दाखवला आहे.
उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला
सर्वोच्च न्यायालयात संजय किशन कौल आणि सुभाष रेड्डी या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी देण्यास नकार दिला. तसेच, परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितले. त्यामुळे परमबीर सिंग आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करतील, अशी माहिती मिळत आहे.
न्यायालयाने विचारले प्रश्न
परमबीर सिंग यांची याचिका फेटाळताना न्यायालयाने सिंग यांच्या वकिलांना काही प्रश्न विचारले. संविधानातील तरतुदीनुसार, नागरिकांच्या मुलभूत हक्कांचा भंग झाल्यास थेट उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तरतूद आहे. कलम-२२६ नुसार, उच्च न्यायालयात जाण्याची तरतूद संविधानात असताना परमबीर सिंग यांनी कलम-३२ नुसार, थेट सर्वोच्च न्यायालयात दाद का मागितली तसेच याचिकेत अनिल देशमुख यांना पक्षकार का करण्यात आलेले नाही, असे प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारत या याचिकावर सुनावणी करण्यास नकार दिला.
(हेही वाचाः वाझे के साथ ‘वो’ कौन थी? एनआयएचा शोध सुरू!)
…म्हणून दाखल केली याचिका
मुंबई पोलिस आयुक्त पदावरुन उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी अंबानी प्रकरणात अक्षम्य चुका केल्याचे तपास करणाऱ्या दहशतवादी विरोधी पथकाच्या लक्षात आले. त्यामुळेच त्यांना पदावरून हटवण्यात आले, असे राज्याचे गृहमंत्री यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखतीत सांगितले होते. रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे प्रकरण असो किंवा मनसुख हिरेन यांचे मृत्यू प्रकरण असो, या दोन्ही प्रकरणाच्या तपासात हलगर्जी केल्याने परमबीर सिंग यांच्यावर कारवाई झाली, असेही गृहमंत्री देशमुख म्हणाले होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी विचारविनिमय करूनच हा निर्णय घेण्यात आला, असेही गृहमंत्र्यांनी त्यावेळी सांगितले होते. तर, आपली कुठल्याही प्रकारची चौकशी झाली नाही, त्यामुळे तडकाफडकी आपली बदली करण्यात आल्याने आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत, चौकशी करण्यासाठी सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
(हेही वाचाः फडणवीस म्हणाले, पवारांना दिली चुकीची माहिती! देशमुख क्वारंटाईन नव्हते तर…)
सिंग यांचा आरोप
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित गृहमंत्री अनिल देशमुख याच्यावर धक्कादायक आरोप केले होते. गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन प्रभारी सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ज्ञानेश्वरी या शासकीय निवासस्थानी गेल्या काही महिन्यांत वारंवार बोलावून घेतले. फेब्रुवारीच्या दरम्यान या भेटी गृहमंत्री आणि वाझे यांच्यात झाल्या. या भेटीत अनिल देशमुख यांनी वाझे यांना वसुली करण्याचे टार्गेट दिले होते. दर महिन्याला किमान १०० कोटी रुपये वसूल करून द्यावेत, असे देशमुखांनी वाझेंना सांगितले असल्याचे या पत्रात परमबीर सिंग यांनी म्हटले होते. मुंबईतील १ हजार ७५० बार आणि रेस्टॉरंटकडून प्रत्येकी २ ते ३ लाख रुपये वसूल करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी वाझे यांना दिले असल्याचे, या पत्रात परमबीर सिंग यांनी म्हटले होते.
Join Our WhatsApp Community