उद्धव ठाकरेंना न्यायालयाचा धक्का, पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच

156

राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह शिंदेंचं की ठाकरेंचं, याबाबत न्यायालय काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान याबाबत न्यायालयाने मंगळवारी मोठा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणण्यास नकार दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या गटासाठी हा मोठा धक्का असून पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोग आपला निर्णय देण्यास मोकळे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

ठाकरेंची याचिका फेटाळली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हा मोठा पेच राज्यातील राजकारणात उभा ठाकला. दरम्यान, पक्षाला पक्षचिन्ह देण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय घेण्यावर स्थगिती आणण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर जोपर्यंत याबाबत सुनावणी होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने याबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. पण न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.

पक्षचिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाकडेच

मंगळवारी झालेल्या सुनावणीत दोन्ही गट आणि निवडणूक आयोगाच्या वकिलांचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने ऐकला. त्यानंतर निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र घटनात्मक संस्था असून सर्वोच्च न्यायालय त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आपला निर्णय घेण्यास पात्र असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता धनुष्यबाण कोणाचा याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लवकरच घेण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.