महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची बुधवारीची सुनावणी संपली आहे. गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार असून हा सुनावणीचा शेवटचा दिवस असणार आहे. याच आठवड्यात सत्तासंघर्षावरील निकाल सर्वोच्च न्यायालय देण्याची शक्यता आहे. दरम्यान मंगळवारी ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर बुधवारी शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. यावेळीस कौल यांनी उद्धव ठाकरेंकडे बहुमत नव्हते आणि अशा व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी राहण्याचा नैतिक अधिकार राहतो का? अशी विचारणा केली.
बुधवारी झालेल्या सुनावणीत शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक ते बहुमत चाचणीचा घटनाक्रम न्यायालयासमोर सांगितला. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीच्या वेळेस म्हणजे राहुल नार्वेकरांच्या निवडीच्या वेळेस मतदान घेण्यात आले होते, त्यावेळेस मविआचे १३ आमदार गैरहजर होते. याचा अर्थ मविआतील लोकांचा त्यांच्यातील लोकांवर विश्वास राहिला नव्हता. जरी अपात्रतेची नोटीस बजावलेले ३९ आमदार बाहेर पडले नसते तरी उद्धव ठाकरे पडले असते. त्यामुळे बहुमत नसलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी राहण्याचा नैतिक अधिकार उरतो का?, अशी विचारणा कौल यांनी केली.
अध्यक्षपदाची निवड ते बहुमत चाचणी
‘१६४ मताधिक्याने राहुल नार्वेकर यांची ३ जुलै रोजी अध्यक्षपदी निवड झाली. तर यावेळी विरोधी उमेदवाराला केवळ १०७ मतांवर समाधान मानावे लागले होते. पण नार्वेकरांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्याच दिवशी त्यांना पदावरून हटवण्याची नोटीस विरोधकांकडून बजवण्यात आली. आणि याच दिवशी सर्व ३९ आमदारांच्या अपात्रतेची नोटीस बजावली. पण ३ जुलैलाच भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद पदी आणि शिंदेंना विधिमंडळ गटनेते पदी नेमणुकीसाठी राहुल नार्वेकरांनी मान्यता दिली. तर २ जुलैला सुनील प्रभूंनी मुख्य प्रतोद म्हणून शिवसेना विधिमंडळ सदस्यांना व्हीप बजावला. बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात हा व्हीप होता. पण २१ जूनलाच त्यांना पदावरून हटवले होते. ४ जुलैला विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाले आणि शिंदेंनी बहुमत चाचणीत बहुमत सिद्ध केले. यामध्ये शिंदेंच्या बाजूने १६४ आणि विरोधात ९९ मते पडली’, असा कौल यांनी घटनाक्रम सांगितला.
(हेही वाचा – Maharashtra Budget Session 2023: शिवसेनेने मागितला राऊतांचा राजीनामा)
माहितीनुसार, गुरुवारच्या शेवटच्या सुनावणीत सकाळी पहिला एक तास शिंदे गटाचे वकील कौल युक्तिवाद करणार आहेत. तसेच त्यानंतर राज्यपालांच्या वतीने तुषार मेहता युक्तिवाद करतील. मग ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी २ वाजल्यानंतर युक्तिवाद करतील.
Join Our WhatsApp Community