एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिल्यानंतर, राज्याच्या राजकारणात चर्चांचे चक्रीवादळ घोंगावू लागले आहे. याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत सूचक विधान केले आहे.
समविचारी पक्षांनी एकत्र येणं ही आनंदाची गोष्ट आहे, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. सुप्रिया सुळेंचे हे विधान राष्ट्रवादी-एमआयएमच्या युतीसाठी सकारात्मक असल्याने आता राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
(हेही वाचाः आता सत्तेसाठी शिवसेना एमआयएम सोबत जाणार? फडणवीस म्हणतात…)
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
राजकीय विषयांमध्ये कुणाला एकत्र येऊन काम करायचे असल्यास सगळ्याच समविचारी पक्षांनी एकत्र येणं ही आनंदाची गोष्ट आहे. विकासकामांसाठी सगळे एकत्र येणार असतील आणि राज्याचं भलं होणार असेल तर कुठल्याही राज्यासाठी ही चांगलीच गोष्ट असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच याबाबत शिवसेनेची भूमिका काय याबाबत फारशी माहिती नाही. सगळा विषय समजून घेतल्यावरच याबाबत भाष्य करणे योग्य ठरेल, अशी सावध भूमिकाही त्यांनी प्रतिक्रिया देताना घेतली आहे.
इम्तियाज जलील यांची ऑफर
एमआयमचे खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री राजेश टोपे यांच्यात युतीची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. एमआयएमचे खासदार जलील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यात काही दिवसांपूर्वी भेट झाली. या भेटीत देशातून भाजपला पराभूत करण्यासाठी आमच्यासोबत या, अशी ऑफर आपण टोपे यांना दिल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले.
(हेही वाचाः आधी सिद्ध करा, मगच महाविकास आघाडीत या! असे कोणाला म्हणाले जयंत पाटील?)
Join Our WhatsApp Community