दहा वर्षांत सुप्रिया सुळेंची संपत्ती वाढली १७३ टक्क्यांनी

139
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या तथा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत गेल्या दहा वर्षांत तब्बल १७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘एडीआर’ या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. खासदारांच्या प्रतिज्ञापत्रांच्या हवाल्याने असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म (एडीआर) या संस्थेने ‘नॅशनल इलेक्शन वॉच’ हा अहवाल तयार केला आहे.
सलग तिसऱ्यांदा खासदार झालेल्या ७१ लोकप्रतिनिधींच्या संपत्तीत २८६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. यात भाजपचे ४३, काँग्रेसचे १०, तृणमूल काँग्रेसचे ७, बीजेडी आणि शिवसेनेच्या प्रत्येकी २, तर जेडीयू, एमआयएम, एनसीपी, शिरोमणी अकाली दल, एआययुडीएफ, आययूएमएल, नॅशनल कॉन्फरन्स यांच्या १-१ खासदाराचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.
या अहवालानुसार, सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये १७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २००९ मध्ये सुप्रिया सुळे यांची संपत्ती ५१.५३ कोटी रुपये इतकी होती. २०१९ मध्ये ती १७३ टक्क्यांनी वाढून १४०.८८ कोटी रुपये इतकी झाली. दहा वर्षांत सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये ८९.३५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सुप्रिया सुळे म्हणतात, तो अहवाल खोटा

यासंदर्भात विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, हा अहवाल खोटा आहे. माझ्या संपत्तीमध्ये वाढ झालेली नाही. तुम्ही माझ्या संपत्तीची कागदपत्रे तपासून पाहा. ही माहिती खोटी असल्याचे तुमच्या ध्यानात येईल, असेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.