कोव्हिड टेंडर घोटाळा प्रकरणी सोमवारी ईडीच्या अधिकारी यांनी केलेल्या चौकशीत युवासेना पदाधिकारी सूरज चव्हाण यांनी स्वतःच्या मालकीची दोन घरे असून मित्राकडून कर्ज घेऊन तसेच इतर स्रोतातून पैसे उभे करून ही घरे घेतल्याची ईडीच्या चौकशीत सांगितले आहे. मात्र चव्हाण यांनी दिलेले स्पष्टीकरण ईडीच्या अधिकाऱ्यांना पटलेले नसून त्यांनी चव्हाण यांच्याकडे याबाबतचे पुरावे आणि कागदपत्रे सादर करायला सांगितल्याचे सूत्रांकडून समजते.
कोव्हिड टेंडर घोटाळा प्रकरणी ईडीने युवासेनेचे पदाधिकारी आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले सूरज चव्हाण यांना गेल्या आठवड्यात समन्स बजावले होते, चव्हाण यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. चव्हाण हे ईडी कार्यालयात सोमवारी दुपारी १ वाजता चौकशीसाठी बलॉर्ड पियर येथील ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. सलग साडेआठ तास चौकशीनंतर चव्हाण यांना रात्री सोडण्यात आले.
चव्हाण यांनी कोव्हिड काळात मुंबई उपनगरात चार महागडे फ्लॅट विकत घेतल्याचे ईडीच्या तपासात समोर आले होते, या संदर्भात ईडीच्या अधिकारी यांनी विकत घेतलेल्या फ्लॅटबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता चव्हाण यांनी दोन घरे त्यांच्या मालकीची असून इतर दोन फ्लॅटबाबत काहीही माहिती दिली आहे. दोन फ्लॅट विकत घेण्यासाठी मित्राकडून कर्ज घेतले होते तसेच इतर स्रोत वापरून घरासाठी निधी उभा केला होता अशी कबुली चव्हाण यांनी दिली. चव्हाण यांनी दिलेल्या स्पष्टीकरण ईडीच्या अधिकाऱ्याना पटलेले नसून अधिकारी यांनी चव्हाण यांच्याकडे याबाबतचे पुरावे आणि कागदपत्राची मागणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
(हेही वाचा – Nitesh Rane : ज्यांनी अधिकाऱ्यांवर हात उचलला त्यांच्यावर कारवाई होणारच – नितेश राणे)
ईडीच्या एका सूत्राने सांगितले की, सूरज चव्हाण यांनी निवडलेल्या कंत्राटदाराला कंत्राट देण्यासाठी मनपा अधिकारी यांच्यावर दबाव टाकला होता. त्यामुळे अपात्र बोलीदारांना जास्त दराने कंत्राटे देण्यात आली, चव्हाण यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे त्यांना आर्थिक फायदा झाला का, याबाबत आम्ही चौकशी करत असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. चव्हाण यांनी खरेदी केलेल्या त्याच्या फ्लॅटची आम्ही चौकशी करत आहोत आणि त्याला संबंधित कागदपत्रे सादर करण्यास सांगितले असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. ईडीच्या अधिकारी यांनी सूरज चव्हाण यांच्या मालकीच्या मुंबईतील चार फ्लॅट्सबाबत चौकशी केली, त्याच सोबत संशयित चव्हाण यांच्या भावाशी संबंधित तीन कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community