UCC : यूसीसीच्या मुद्यावर १९ लाख लोकांनी केल्या सूचना; सुशील कुमार मोदी यांची माहिती

164
UCC : यूसीसीच्या मुद्यावर १९ लाख लोकांनी केल्या सूचना; सुशील कुमार मोदी यांची माहिती
UCC : यूसीसीच्या मुद्यावर १९ लाख लोकांनी केल्या सूचना; सुशील कुमार मोदी यांची माहिती

वंदना बर्वे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही असलेल्या समान नागरी संहिता विधेयकाच्या मुद्यावर १९ लाख लोकांनी सूचना दिल्या असल्याची माहिती सुशीलकुमार मोदी यांनी आजच्या बैठकीत दिली. राज्यसभेचे खासदार सुशील कुमार मोदी यांनी आज विधी मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या सदस्यांची बैठक बोलाविली होती. मोदी या समितीचे अध्यक्ष आहेत. देशातील राजकीय वातावरण लक्षात घेता ही बैठक वादळी होईल असा अंदाज वर्तविला जात होता. परंतु, अतिशय शांततामय वातावरण ही बैठक संपन्न झाली.

शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राउत आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्यासह विविध पक्षांच्या सदस्यांनी या बैठकीला हजेरी लावली. यात बसपाचे मलूक नागर, भाजपचे रमेश पोखरियाल आणि महेश जेठमलानी, काँग्रेसचे विवेक तन्खा यांचा समावेश आहे. दरम्यान, सेनेचे खासदार राजन विचारे यांनी सांगितले की, स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत समान नागरी संहिता विधेयकाच्या मुद्यावर कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. तर, समितीचे अध्यक्ष सुशील कुमार मोदी यांनी यूसीसीबाबत केवळ माहिती दिली.

(हेही वाचा – मुंबईत राजकीय बैठकांचे सत्र; काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या बैठका)

समितीने १४ जून रोजी यूसीसीच्या मुद्यावर लोकांकडून सूचना मागविल्या होत्या. १३ जुलै सूचना देण्याची शेवटची तारीख आहे. समितीला आतापर्यंत नागरिक, संस्था, तज्ज्ञ अशा विविध गटांकडून १९ लाख सूचना प्राप्त झाल्या आहेत. येत्या १० दिवसात आणखी काही सूचना येण्याची शक्यता आहे. मुदत संपल्यानंतर यूसीसीबाबत आलेल्या सूचनांच सदस्यांना माहिती दिली जाईल आणि त्यानंतर यावर चर्चा सुध्दा होईल, असे मोदी यांनी सांगितले असल्याचे विचारे यांनी सांगितले. मात्र, विरोधी पक्षांच्या खासदारांनी विधेयकाच्या मुद्यावर सरकारच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली. हा केवळ कायदा नसून प्रत्येक धर्म आणि जातीशी संबधित आहे, ही बाब सरकारने लक्षात ठेवायला पाहिजे, असे विरोधक म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार संसदेच्या पावसाळी अधिवेशनात समान नागरी संहिता विधेयक सादर करणार असल्याची चर्चा जोरात आहे. यासाठी सरकार आणि प्रशासनाच्या पातळीवर तयारी केली जात आहे.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.