राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार ११ मे २०२३ रोजी आपला निर्णय दिला. त्या निर्णयानुसार आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. यानंतर आता राज्यातील राजकारणामध्ये वेगाने गोष्टी घडत आहेत. ‘आगामी निवडणूक’ या मुद्द्यावरून प्रत्येक पक्षाच्या बैठका सुरु झाल्या आहेत. अशातच ठाकरे गटाकडून ‘महाप्रबोधन’ यात्रा सुरु करण्यात आली आहे. यादरम्यान ठाकरे गटात आपापसात वाद सुरु झाला असून त्यांच्यातील हा अंतर्गत वाद आता चर्चेचा विषय बनला आहे.
(हेही वाचा – Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांना मोठा झटका, ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख शिंदे गटात दाखल)
माहितीनुसार, सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर बीडमधील जिल्हाप्रमुखाने गंभीर आरोप केले. सुषमा अंधारे (Sushma Andhare) या पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागत असल्याचा दावा ठाकरे गटाचे बीडमधील जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला होता. यामुळे आमच्यात भांडण झाले, त्यावेळी मी सुषमा अंधारे यांच्या दोन चापटा लगावल्या, असे आप्पासाहेब जाधव यांनी जाहीरपणे सांगितले होते. आप्पासाहेब जाधव यांचा हा दावा सुषमा अंधारे यांनी फेटाळून लावला असला तरीही या प्रकाराची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली आहे. या सगळ्यानंतर एका रात्रीत मातोश्रीवरुन आप्पासाहेब जाधव यांच्या हकालपट्टीचा आदेश निघाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच बीडच्या संपर्कप्रमुखांवरही कारवाई करण्यात आली आहे. मात्र याबाबत पक्षाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
नेमकं प्रकरण काय?
ठाकरे गटाकडून बीडमध्ये २० मे रोजी महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी १८ मे गुरुवारी सभास्थळाची पाहणी केली. त्यावेळी उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. या सगळ्या धुमश्चक्रीत वरेकर यांच्या कार्यकर्त्यांनी आप्पासाहेब जाधव यांची गाडीची काच फोडली. यानंतर आप्पासाहेब जाधव यांनी परस्पर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्यावर आरोप केले. “सुषमा अंधारे (Sushma Andhare) या बीड जिल्ह्यात खूप दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागत आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये एसी बसवण्यासाठी, फर्निचर आणि सोफ्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागत आहेत. माझे जिल्हाप्रमुखपद हे देखील सुषमा अंधारे यांनी विक्रीला काढले आहे. मी पक्ष वाढवण्यासाठी रक्ताचं पाणी केलं, हाडाची काडं केली. माझ्या लेकराबाळांच्या मुखातला घास काढून पक्षवाढीसाठी पैसे खर्च केले. पण सुषमा अंधारे यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे सुषमा अंधारे आणि माझं भांडण झालं, तेव्हा मी सुषमा अंधारे यांच्या दोन चापटा लगावल्या.” असा दावा आप्पासाहेब जाधव यांनी आपल्या व्हिडिओमधून केलाआहे.
हेही पहा –
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
आप्पासाहेब जाधव यांच्या या खळबळजनक दाव्यानंतर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी सुषमा अंधारे यांनी सांगितले की, “आप्पासाहेब जाधव यांनी एक व्हिडिओ रिलीज केला, माझ्यावर लाखभर रुपयाचा आरोप केला. तेव्हा मला सगळा गुंता लक्षात येत आहे. हे जे काही सगळं चाललं आहे, ते महाप्रबोधन यात्रेला बदनाम करण्यासाठी सुरु आहे. संजय राऊत यांच्या सभेआधी वादळ निर्माण करण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरु आहेत. परंतु, मिंधे गटाने कितीही प्रयत्न केले तरीही, महाप्रबोधन यात्रेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तरी ही सभा होणार असं सांगत, आप्पासाहेब जाधव यांनी मारहाण केल्याचा दावाही सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी यावेळी फेटाळून लावला आहे.
Join Our WhatsApp Community