उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या जोशात येऊन बोलत आहेत, त्यामुळे त्यांची जीभ घसरण्याचे प्रकार वाढत आहेत. असेच एका सभेत बोलताना त्यांनी अचानक रेड्याला शिकवले पण तुम्ही माणसाला शिकवले नाही, असे म्हणत थेट संत ज्ञानेश्वर माउलींवर पर्यायाने भागवत धर्मावर टीका केली. कुत्र्याच्या मागे तुपाची बुधली घेऊन धावणाऱ्या संत नामदेवांची त्यांनी खिल्ली उडवली. या प्रकारांमुळे वारकरी संप्रदायामध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन माफी मागण्याची तयारी दर्शवली, मात्र तरीही अंधारे यांच्या अडचणी सुटणार नाही, असे दिसत आहे. कारण अंधारे यांनी धार्मिक भावना दुखावल्याबद्द्ल त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प प्रशांत महाराज मोरे देहूकर यांनी निवेदनाद्वारे केली.
काय म्हटले ह.भ.प प्रशांत महाराज मोरे देहूकर यांनी निवेदनात?
सुषमा अंधारे नावाच्या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी वारकरी संप्रदायातील आणि संत मांदियाळीतील थोर संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज आणि संत एकनाथ महाराज यांचे विकृत टीकात्मक विडंबन केले आहे. तसेच त्यांनी आपले उपास्य दैवत प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण भगवंत यांच्यावर देखील टीका केली आहे. आपला महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. आपल्या महाराष्ट्राला शेकडो वर्षांची वारकरी परंपरा आहे, ही केवळ संतांच्या विचाराची द्योतक आहे. सदर व्यक्तीच्या वक्तव्यामुळे समस्त वारकरी संप्रदायाच्या किबहुना संतांचे विचार-आचार आणि उच्चाराचे पाईक असणाऱ्या समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. संतांच्या माध्यमातूनच समाजाचे अलौकिक असे भक्तीमय चैतन्य आणि शक्तीमय ज्ञान प्राप्त होत आहे. सर्व संत-वारकऱ्यांसाठी ऊर्जा आणि प्रेरणास्त्रोत आहेत. भागवत धर्माची सर्व विश्वात उभारणी करणाऱ्या संतांचे असे विकृत टीकात्मक विडंबन करणे निश्चितच अवमानकारक आणि निषेधार्ह आहे. सांप्रत काळात देखील बौद्धिक दिवाळखोर असणाऱ्या अशा काही व्यक्तीच्या माध्यमातून विकृती डोके वर काढू पाहत आहेत. सुसंस्कृतपणाचा बुरखा घालणाऱ्या अशा विकृतीला आणि प्रवृत्तीला वेळीच पायबंद घालणे अत्यावश्यक आणि समाजहितकारक आहे, असे संत तुकाराम महाराज ११ वे वंशज, अध्यक्ष, वारकरी साहित्य परिषद पुणे जिल्हा ह.भ.प प्रशांत महाराज मोरे देहूकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community