राज्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडाची कार्यवाही केली जाते. मात्र ज्या वाहनचालकांवर पाच ते सहा वेळा दंडात्मक कारवाई झाली आहे, त्यांचा वाहन परवाना काही दिवस, महिन्यांसाठी निलंबित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.
रस्ता सुरक्षा विषयक उपाययोजना व सुधारित धोरण ठरविण्याबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे सोमवारी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, द्रूतगती महामार्गावर वेगाने मार्गिका बदलणाऱ्या (लेन जंप) वाहनचालकांवर कारवाईसाठी पथक नेमावे. या पथकाच्या माध्यमातून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर नजर ठेवतानच त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मोहिम हाती घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर अशी मोहिम तातडीने राबविण्याची सूचनाही त्यांनी केली.
( हेही वाचा : वाहन परवान्यासाठी आता स्वयंचलित वाहन चलन चाचणी पथ; मुख्यमंत्र्यांची घोषणा )
अपघात रोखण्यासाठी ज्या स्मार्ट यंत्रणा जगातल्या रस्त्यांवर आहेत त्या यंत्रणा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर बसविण्यात याव्यात. यामुळे समृद्धी महामार्ग जगातला सर्वात स्मार्ट महामार्ग बनू शकेल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
६ कोटी जणांवर कारवाई
राज्यात १ हजार ४ ठिकाणी ब्लॅक स्पॉट असून, सुमारे ७२ टक्के अपघात अतिवेगामुळे होतात. तर ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट घोषित आहेत, तेथील अपघाताचे प्रमाण ५३ टक्के असल्याचे अहवालातून समोर आले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यात सुमारे ६ कोटी जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अपघात नियंत्रण आणि मदतीसाठी मृत्यूंजय दूत प्रकल्प राबविला जात असून, राज्यभर ५३५१ मृत्यूंजय दूत नेमण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community