आता ‘त्या’ १२ आमदारांचा वाद पोहचला राज्यपालांच्या दरबारी !

निलंबित आमदारांनी राजभवनात जाऊन राज्यपाल यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यावेळी भाजपचे नेते गिरीश महाजन, आशिष शेलार, संजय कुटे, अतुल भातखळकर यांच्यासह १२ आमदार उपस्थित होते.

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा तिढा अजून सुटला नसताना आता आणखी 12 आमदारांचा वाद राज्यपालांच्या दरबारी पोहोचण्याची शक्यता आहे. हे बारा आमदार खुद्द भाजपचे असून, आता राज्यपाल नेमके काय करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून गैरवर्तनाच्या कारणावरून भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. या निलंबामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. आता हे सर्वच्या सर्व निलंबित आमदार राज्यपालांना भेटले असून आमदारांनी राज्यपालांना भेटून वस्तुस्थिती मांडतानाच ठाकरे सरकारची तक्रार केली.

12 का बदला 12 से…

ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. काही आमदारांनी तालिका अध्यक्षांचा माईक ओढला. तर काहींनी थेट अध्यक्षांनाच शिवीगाळ केली. त्यामुळे अध्यक्ष प्रचंड संतप्त झाले होते. परिणामी या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले. मात्र या निलंबानंतर ठाकरे सरकारने 12 आमदारांचे निलंबन करून बदला घेतला की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

(हेही वाचा : निलंबनानंतर फडणवीस आणि निलंबित आमदारांचा संताप! काय आहेत प्रतिक्रिया?)

भाजपचा आक्षेप! 

भाजपच्या या १२ आमदारांचे निलंबन केल्यामुळे विरोधकांचे सभागृहातील संख्याबळ कमी झाले आहे. त्यामुळे भाजपला हा धक्का मानला जात आहे. दरम्यान जेव्हा संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर आक्षेप घेतला. भाजपचा आमदारांनी शिवीगाळ केली नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच हा निर्णय म्हणजे एकतर्फी असून विरोधी पक्षाला त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही, असे सांगत हा प्रकार अन्यायकारक आहे, असेही फडणवीस म्हणाले. त्यानंतर निलंबित आमदारांनी राजभवनात जाऊन राज्यपाल यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यावेळी भाजपचे नेते गिरीश महाजन, आशिष शेलार, संजय कुटे, अतुल भातखळकर यांच्यासह १२ आमदार उपस्थित होते. ओबीसीच्या आरक्षणावर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना बोलू दिले नाही. तसेच कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केला असता तालिका अध्यक्षांना शिवीगाळ केली असल्याचा खोटा आरोप करत भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले, असे निलंबित आमदारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here