एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणीबाबत अद्याप तोडगा निघाला नाही. याकरिता, कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे. संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांचे एसटी महामंडळाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी संपावर असलेल्या कामगारांची एकजूट तोडण्यासाठी राज्यभर आणि अमरावती जिल्ह्यात कामगारांचे निलंबन करण्याच्या राज्य शासनाच्या कृतीचा निषेध भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या नेतृत्वात करण्यात आला.
सूडबुद्धीने कामगारांवर कारवाई
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवराय कुळकर्णी यांच्या नेतृत्वात एसटी कामगारांनी जोरदार निदर्शने केली. याप्रसंगी शिवराय कुळकर्णी यांनी राज्य शासनाच्या कामगार व जनविरोधी कृत्यावर जोरदार हल्ला चढवला. आर्थिकरित्या पिचलेल्या व अर्धपोटी काम करणाऱ्या एसटी कामगारांच्या विरोधात जनतेत रोष निर्माण करण्याचे काम राज्य सरकार करते आहे. एसटी कामगारांनी जनतेला वेठीस धरल्याचा अपप्रचार राज्यातील महाभकास आघाडी सरकारने चालवला आहे. या वसुली सरकारला जनतेला न्याय द्यायचा असेल तर सूडबुद्धीने कामगारांवर निलंबनाच्या कारवाया करण्याऐवजी त्यांनी तात्काळ महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याचा रास्त निर्णय घेतला पाहिजे. एसटी कर्मचाऱ्यांची हालत जनतेला माहीत असल्याने जनतेचा पाठींबा देखील या आंदोलनाला असल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी स्पष्ट केले.
‘संप मागे घेणार नाही’
भाजपाच्या प्रदेश विधी आघाडीचे उपाध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे यांनी आपण संपातील कामगारांसाठी वेळप्रसंगी न्यायिक लढा देऊ असे स्पष्ट केले. कामगार नेते चंद्रकांत खानझोडे यांनी एसटी कामगारांची एकजूट सुवर्णाक्षराने लिहिली जाणार असून विजयाच्या दिशेने आंदोलन सुरू असल्याचे स्पष्ट केले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले. निवडक कामगारांवरच कशाला राज्यातील सर्व कामगारांना निलंबित केले तरी संप मागे घेतला जाणार नाही, अशा भावना कामगार प्रतिनिधींनी व्यक्त केल्या.
( हेही वाचा : कारवाईचे सत्र सुरूच! एसटी संपात आणखी ५४२ कर्मचाऱ्यांचे निलंबन )
अनेक कार्यकर्ते उपस्थित
आजच्या आंदोलनात अमरावती व बडनेरा एसटी कामगारांसह भाजपाचे विनय नगरकर, सुभाष श्रीखंडे, माजी नगरसेविका गंगाताई खारकर, कामगार आघाडीच्या प्रमुख भाग्यश्री देशमुख, राहुल जाधव, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव योगेश वानखडे, शहर अध्यक्ष विवेक चुटके, संदीप अंबाडकर, भाजयुमोचे अध्यक्ष प्रणित सोनी, भारतीताई गुहे, श्याम उर्फ पप्पू जोशी, अभय बपोरीकर, राजेश शर्मा, कन्हय्या अग्रवाल, किरण अंबाडकर, अन्नू शर्मा, उमेश निलगिरे, योगेश निमकर, कुणाल सोनी, भुषण हरकूट यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community