-
प्रतिनिधी
बीड जिल्हा रुग्णालयात कोविड (Covid) काळात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांना तात्काळ निलंबित करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंगळवारी विधानसभेत केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील तीन महिन्यांत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. ही माहिती त्यांनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
या प्रकरणी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आबिटकर म्हणाले, “कोविड (Covid) काळात झालेला भ्रष्टाचार हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. या कठीण काळातही काही लोकांनी स्वार्थासाठी जनतेच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केला, हे अक्षम्य आहे. दोषींना कोणतीही सवलत किंवा माफी दिली जाणार नाही.”
(हेही वाचा – Disha Salian Case : उद्धव ठाकरे यांना केले आरोपी; आदित्य ठाकरेंचा ड्रग्सच्या व्यापारात हात, वकील नीलेश ओझा यांचा दावा)
मंत्री आबिटकर यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती पुढील तीन महिन्यांत आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. “या प्रकरणात पारदर्शकता आणि कठोरता राखली जाईल, याची आम्ही खात्री देतो,” असे त्यांनी स्पष्ट केले. (Covid)
बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड (Covid) काळातील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे यापूर्वीही अनेक चर्चा झाल्या होत्या. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार आणि गैरप्रकारांचा समावेश असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. आता सरकारच्या या निर्णयामुळे दोषींना शिक्षा होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, जनतेला न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community