शेट्टी घेणार महाविकास आघाडीशी ‘कट्टी’!

राजू शेट्टी हे लवकरच महाविकास आघाडीतून बाहेर पडतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता राजू शेट्टी यांनीच आघाडी सरकारने ही आम्हाला फसवल्याचा आरोप केला आहे.

राज्यात ठाकरे सरकारवर विरोधकांकडून टीका होत असताना, आता राजू शेट्टी देखील महत्वाचा निर्णय घेणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारनंतर आघाडी सरकारनेही आम्हाला फसवल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

जयंतरावांचा टप्प्यातला कार्यक्रम गेला फेल

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीही माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. ही बंडखोरी शमवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची शिष्टाई यशस्वी ठरू शकलेली नाही. राजू शेट्टी यांच्याशी आमचा संपर्क आहे, त्यांच्या काही तक्रारी आहेत. भविष्यात त्यांचे समाधान करण्याविषयी आमची चर्चा झाली आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले होते. राजू शेट्टी हे लवकरच महाविकास आघाडीतून बाहेर पडतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता राजू शेट्टी यांनीच आघाडी सरकारने ही आम्हाला फसवल्याचा आरोप केला आहे.

(हेही वाचाः राणेंकडून शिवसेनेचा टप्प्यात कार्यक्रम!)

सोलापूर हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला

सोलापूर जिल्हा हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २००९ मध्ये आमदार भारत भालके यांनी स्वाभिमानीकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला होता. तर २०१४ मध्ये प्रशांत परिचारक यांच्याकडून, आमदार भारत भालके हे निसटत्या मतांनी पराभूत झाले होते. २०१९ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीत सहभागी झाली होती.

याआधी राजू शेट्टींची महाविकास आघाडीवर टीका

गेल्या दीड वर्षांपासून महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आहे. मात्र राजू शेट्टी यांची या सरकारवरची नाराजी वारंवार समोर आली आहे. अतिवृष्टी काळातील तुटपुंज्या अनुदानावरुन, तर वीज तोडणीवरुनही शेट्टी यांनी सरकारवर टीका केली होती. एवढेच नाही तर केंद्रात भाजप सरकारसोबत असताना राजू शेट्टी सतत त्यांच्या विरोधात मत मांडत होते. त्यांना सोडून महाविकास आघाडीत सहभागी झाल्यानंतर, आता ते आघाडी सरकारला धारेवर धरत आहेत. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर त्यांनी जोरदार टीका केली होती. लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे म्हणून ते सरकारच्या विरोधात लढत आहेत. वीज कनेक्शन कट केल्यास हात कलम करण्याची भाषा वापरत आहेत. कर्जमाफीच्या धोरणाबाबतही ते सरकारवर तुटून पडत आहेत.

(हेही वाचाः मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी प्रदीप शर्मांची चौकशी! एनआयएच्या कार्यालयात दाखल!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here