मुंबई उपनगरात संपूर्ण डिसेंबर महिन्यात स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई अभियान: पालकमंत्र्यांची घोषणा

161
‘स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई अभियान मुंबई उपनगर जिल्ह्यातील १५ वॉर्डमध्ये १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. शासनाचे सर्व विभाग, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना तसेच नागरिकांनी या अभियानात श्रमदान करून हा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
‘स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई अभियान ‘याविषयी  मुंबई महानगर प्रदेश विकासचे कार्यालय येथे  पूर्व तयारीबाबत आयोजित  बैठकीत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा, मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त  चंदा जाधव, विशेष कार्यकारी अधिकारी  डॉ. सुभाष दळवी,जिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडे यासह विविध शासकीय विभागांचे अधिका-यांबरोबरच विविध क्षेत्रातील सामाजिक संस्था, एनजीओ, असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
हे अभियान मुंबई महापालिकामार्फत राबवण्यात येणार असून त्यामध्ये सर्व शासकीय/निमशासकीय/खाजगी संस्थाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. मुंबई उपनगरातील पंधरा वॉर्डमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना, स्वयंसेवी संस्था, शासनाचे सर्व विभाग, नागरिक यांना ज्या ज्या वॉर्डमध्ये शक्य होईल तिथे आपला परिसर, शाळा ,महाविद्यालय, पोलीस स्टेशन, सार्वजनिक ठिकाणे, सागरी किनारे यांची स्वच्छता करावयाची आहे. प्रत्येकाने दि. १ ते ३१ डिसेंबर २०२२ या अभियान कालावधीत प्रत्येक शनिवार, रविवारी  जेवढा वेळ श्रमदान करता येईल त्या सर्वांनी संबंधित वॉर्ड निहाय स्वच्छतेचे उपक्रम राबवता येतील, असे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक संस्था, त्यांना ज्याप्रकारे या उपक्रमात सहभाग घेणे शक्य आहे. याची माहिती वॉर्ड ऑफिसर यांना द्यावी. शाळा महाविद्यालयामध्ये जनजागृती पर कार्यक्रमही घेता येतील. विविध सामाजिक संघटना त्यांना शक्य असेल त्या सोयीच्या ठिकाणी श्रमदान करू शकतील. सर्व सार्वजनिक ठिकाणे जसे की रस्ते, पदपथ, रेल्वे प्लॅटफार्म,  उद्याने, मंडया, सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहे, शाळा, महाविद्यालये, शासकीय/निमशासकीय कार्यालये, बीचेस, पर्यटन स्थळे, फ्लायओव्हर इत्यादि ठिकाणांची मिशन मोडमध्ये काम करता येईल.
मुंबई उपनगर जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या शाळा महाविद्यालय, सर्व गृहनिर्माण सोसायट्या, सर्व रुग्णालये, सार्वजनिक ठिकाण, प्रत्येक शासकीय विभागाच्या अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. जनजागृती पर उपक्रम राबवणे, स्वच्छतेचे संदेश देणे, सागर किनारे स्वच्छ करणे, स्वच्छता अभियान राबवणे ज्या वॉर्डमध्ये असे उपक्रम राबवण्यासाठी प्रत्येक संस्थेला शक्य आहे तिथे त्यांनी मदत करावी. प्रत्येक शासकीय विभागांनी आपल्या अखत्यारितील यंत्रणांना याची माहिती द्यावी. १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत प्रत्येक दिवसाचा उपक्रम काय असेल याची माहिती सर्वांना कळवण्यात येईल, असे उपनगराच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यावेळी बोलताना सांगितले. वॉर्डनिहाय  होणाऱ्या उपक्रमांना बीएमसी तसेच शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, या सर्व कार्यवाहीसाठी संबंधित वॉर्ड ऑफिसर क्षेत्रस्तरावर समन्वय करतील असेही यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.