आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनीदेखील आता आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत माढा आणि सोलापूर मतदारसंघासह राज्यातील 48 जागा स्वराज्य पक्ष स्वबळावर लढवणार आहे, अशी घोषणा स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Chhatrapati) हे पंढरपूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आगामी लोकसभा निवडणुकीत स्वराज पक्ष उतरणार असल्याचे त्यांनी म्हटले. कोणत्या आघाडीत जायचे याबाबत अजून काहीच ठरवलेले नसल्याचे स्वराज पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजी महाराज यांनी सांगितले. निवडणुकीच्यावेळी ज्या पद्धतीची समीकरणे बनतील ते पाहून ऐनवेळी आघाडीबाबत निर्णय घेणार आहोत.
सरकारला उपरोधिक टोला
दरम्यान संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, मराठा समाजाला महिनाभरात आरक्षण मिळेल की नाही, हे सांगायला मी मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना उपरोधिकपणे लगावला आहे.
आधले-मधले लोक गडबड करतात
संभाजीराजे छत्रपती पुढे बोलताना म्हणाले की, माझी आरक्षणासंदर्भातील भूमिका मी सर्वपक्षीय बैठकीत मांडली आहे. हा महाराष्ट्र बहुजनांचा आहे. तो एकाच छताखाली गुण्यागोविंदाने नांदावा, अशी अपेक्षा आहे. मात्र, आधले-मधले लोक गडबड करतात, त्यातून मराठा-ओबीसींमध्ये वाद वाढू पाहात आहे. नारायण राणे यांच्या विधानावर मात्र आमच त्यांचे म्हणणे ऐकले नाही, असे सांगितले. तसेच, मराठा समाजाला देण्यात येणारे आरक्षण हे न्यायालयात टिकणारे असावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
महाराष्ट्र बहुजन समाजाचा
संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, महाराष्ट्र हा बहुजन समाजाचा आहे. राजर्षी शाहू महाराजांनी 1902 मध्ये बहुजनांना आरक्षण दिले होते. त्यावेळी त्यांची भूमिका ही सर्व बहुजन समाज एका छताखाली राहावा अशीच होती. त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनीही अठरापगड जातींना एकत्रित केले होते. मराठा आणि ओबीसी हे भाऊ असून काही मंडळी हे वातावरण बिघडवत आहे. 96 कुळी मराठ्यांना कुणबी मधून आरक्षण नको या राणेंच्या वक्तव्यावर कोणतीही टिप्पणी करणे त्यांनी टाळले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल मला माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत असे सांगत जे आरक्षण देणार असाल ते टिकणारे असावे असेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community