पर्यटकांना मिळणार दिलासा! ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प लवकरच होणार खुला

120

कोरोना संसर्गामुळे बंद करण्यात आलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या संदर्भात मुनगंटीवार यांनी सोमवारी मदत व पुनर्वसन विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता आणि जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याशी चर्चा केली. सदर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्याबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन अपर मुख्य सचिव असीम गुप्ता यांनी दिले.

काय म्हणाले मुनगंटीवार 

या मागणीसंदर्भात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रिसोर्ट व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली व निवेदन सादर केले.शिष्टमंडळासमक्ष मुनगंटीवार यांनी असीम गुप्ता यांच्याशी चर्चा केली. असीम गुप्ता यांच्याशी चर्चा करताना सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. कोरोनाची रूग्णसंख्या आता आटोक्यात आली असल्याने सदर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्यास आता कोणतीही हरकत नाही.

(हेही वाचा – जोगेश्वरी शिल्पग्राम आणि दादरच्या प्रमोद महाजन उद्यानांच्या देखभालीवर पाच कोटींचा खर्च)

देशातील एकही व्याघ्र प्रकल्प बंद नाही

सदर व्याघ्र प्रकल्प बंद असल्यामुळे परिसरातील रिसोर्ट व्यावसायिक तसेच त्यावर अवलंबून असलेल्या घटकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. देशातील एकही व्याघ्र प्रकल्प सद्यःस्थितीत बंद नाही. अशा परिस्थीतीत केवळ ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बंद असणे संयुक्तीक नाही. हा व्याघ्र प्रकल्प त्वरीत पर्यटकांसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी मुनगंटीवार यांनी शासनाकडे केली आहे. शिष्टमंडळात संजय मानकर, संजय ढिमोले, आशिष पुराणिक, शुभम ढिमोले आदींची उपस्थिती होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.