आधीच पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष, आता कोकणाला नुकसान भरपाई देखील मिळेना!

जिल्ह्याचे पालकमंत्री असून नसल्यासारखे असताना, आता निधीसाठी देखील कोकणकरांना वाटच बघावी लागत आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, एक महिना उलटूनही नुकसान ग्रस्तांना भरपाई मिळालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही तासांत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला खरा, पण कोकणी जनतेच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे. आधीच रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असून नसल्यासारखे असताना, आता निधीसाठी देखील कोकणकरांना वाटच बघावी लागत आहे.

रत्नागिरीला २१ कोटीही मिळेनात

रत्नागिरी जिल्ह्यात ३० कोटींच्या नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यात आले होते. घर, गोठे यांचे पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान असेल, तरच भरपाईची रक्कम दिली जाणार असल्याने, पंचनामे तपासून अनेक किरकोळ नुकसान झालेल्यांची नावे यादीतून वगळण्यात आली. सुमारे तीस कोटींवरुन ही यादी २१ कोटींवर जिल्हा प्रशासनाने अंतिम करुन, राज्य शासनाकडे पाठवून दिली. मात्र अजूनही हे २१ कोटी जिल्हा प्रशासनाला मिळाले नसून, नुकसान ग्रस्तांना निधी तरी कुठून देणार, असा प्रश्न आता स्थानिक प्रशासनाला पडला आहे.

(हेही वाचाः ‘तौक्ते’ वादळाची कोकणवासीयांना ‘अशी’ मिळणार नुकसान भरपाई! )

मुख्यमंत्री साहेब घोषणा केली पुढे काय?

तौक्ते वादळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मी कोकणाला वाऱ्यावर सोडणार नसल्याचे सांगत मदतीची घोषणा केली. मात्र, आता ही मदत अद्यापही लोकांपर्यंत पोहोचली नसल्याने मुख्यमंत्री साहेब घोषणा तर केलीत पण पुढे काय, असा सवाल आता कोकणी जनता विचारू लागली आहे. आधीच जिल्ह्याचा कोरोना निधी मिळणे गेल्या वर्षीपासून बंद झाले असून, पावसाळ्यात प्रशासनाकडून केली जाणारी मदत बंद झाली आहे. वारंवार स्थानिक प्रशासनाला राज्य सरकारकडे हात पसरावे लागत असून, आता या नुकसान भरपाईच्या निधीसाठी ठाकरे सरकारला आठवण करुन देण्याची वेळ स्थानिक प्रशासनावर आली आहे.

या घोषणेचे काय?

राज्यामध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. केंद्र शासनाने विहित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने मदत देण्यात येणार असल्यामुळे, वाढीव दरामुळे पडणारा आर्थिक भार राज्य शासनाच्या निधीमधून करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार आकडे देखील राज्य सरकारने ठरवले होते.

(हेही वाचाः तौक्ते चक्रीवादळाने राज्यात पाडले साडेपाच हजार विजेचे खांब)

असा आहे मदत निधी

 1. घराचे पूर्ण/अंशतः (१५ टक्के) नुकसान झालेल्यांचे कपडे, भांड्यांचे नुकसान– 5000 रु. प्रति कुटुंब
 2. पूर्ण नष्ट झालेले पक्के/कच्चे घर – 1,50,000 रु. प्रति घर
 3. अंशत: पडझड झालेले (किमान 15 टक्के) पक्के/कच्चे घर – 15,000 रु. प्रति घर
 4. अंशत: पडझड झालेले (किमान 25 टक्के) पक्क्या/कच्चे घर – 25,000 रु.प्रति घर
 5. अंशत: पडझड झालेले (किमान 50 टक्के) पक्क्या/कच्चे घर – 50,000 रु.प्रति घर.
 6. नष्ट झालेल्या झोपडीपैकी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पात्र असलेल्या झोपड्यांना – 15,000 मदत रू. प्रति झोपडी.

बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठी मदत

 • बहुवार्षिक पिके- 50,000 रू. प्रति हेक्टर.
 • नारळ झाडासाठी – 250 रू. प्रति झाड.
 • सुपारी झाडासाठी – 50 रू. प्रति झाड.
 • दुकानदार व टपरीधारक- जे स्थानिक रहिवासी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्ड धारक आहेत त्यांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या 75 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 10,000 रू.पर्यंत आर्थिक मदत देण्यात येईल.

मत्स व्यवसायिकांना भरपाई

 • बोटींची अंशत: दुरूस्ती – 10,000 रू.
 • पूर्णत: नष्ट झालेल्या बोटींसाठी – 25,000 रू.
 • अंशत: बाधित झालेल्या जाळयांच्या दुरूस्तीसाठी – 5000 रू.
 • पूर्णत: नष्ट झालेल्या जाळयांसाठी – 5000 रू.
 • कुक्कुटपालन शेडसाठी प्रत्यक्ष नुकसान – 5000 रू.
 • मृत्यूसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून 4 लक्ष रुपये व मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अतिरिक्त 1 लक्ष रुपये इतकी मदत देण्यात येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here