निवडणूक आयोगाने राज्यातील शिक्षकांना मंगळवार, २० फेब्रुवारीपासून निवडणुकीच्या कामासाठी रुजू होण्याचा आदेश काढला आहे. मात्र त्याआधीच मुंबईतील शारदाश्रम शाळेतील शिक्षक १९ फेब्रुवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटले आणि त्यांनी त्यांची व्यथा मांडली. त्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिक्षकांनी निवडणुकीच्या कामाला हजर राहू नये, असे थेट फर्मान काढले.
पाच वर्षे निवडणूक आयोग काय करते?
शारदाश्रम शाळेतील शिक्षकांची भेट झाल्यावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, पाच वर्षे निवडणूक आयोग काय करत असते? त्यांच्याकडे यंत्रणा नाही का? निवडणुका अचानक जाहीर होत नसतात. त्या कधी जाहीर होणार हे माहित असते, तरीही निवडणूक आयोग त्याची तयारी का करत नाही? मग ऐनवेळी शिक्षकांना का या कामासाठी जुंपतात? यात मुलांचे नुकसान का व्हावे? त्यामुळे मनसेचे नेते मंगळवारी निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर कोणत्याही शिक्षकाने निवडणूक आयोगाच्या कामाला रुजू होऊ नये, त्यांच्यावर काय शिस्तभंगाची कारवाई केली जाते ते आम्ही बघू, असे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.
न्यायालयानेही यासंबंधी निर्णय दिला आहे. मतदानाच्या आधी तीन दिवस आणि नंतरचे २ दिवस इतकेच दिवस शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी घेता येऊ शकते, असे म्हटले आहे. न्यायालयाचा निर्णय असूनही निवडणूक आयोग असा का निर्णय देते? हा विषय सध्या तरी मुंबई पुरता आपल्याकडे आला आहे, राज्यपातळीवर शिक्षक माझ्याकडे येतील तेव्हा त्यांनाही निर्णय देऊ, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.
Join Our WhatsApp Community