मुंबई विमानतळावर उभे असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्यांचा जळगाव दौरा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जळगावात महाकुंभ २०२३च्या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि योगी आदित्यनाथ एका व्यासपीठावर येणार असल्याने हा दौरा विशेष चर्चेत आला होता.
सोमवारी दुपारी ११.३० च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावरून जळगावच्या दिशेने रवाना होणार होते. मात्र, ऐनवेळी शासकीय विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना नियोजित ठिकाणी रवाना होता आले नाही. दुपारी १ वाजता जळगाव येथे अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना नायकडा समाजातर्फे आयोजित महाकुंभ २०२३ कार्यक्रमास ते हजेरी लावणार होते.
या कार्यक्रमात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी होणार असल्याने, एकनाथ शिंदे यांचा हा दौरा विशेष चर्चेत आला होता. मात्र, विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांच्या सहभागाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड होण्याची या महिन्यातील दुसरी वेळ आहे. याआधी ५ जानेवारीला पुणे दौऱ्यावर जात असताना एकनाथ शिंदे यांच्या विमानात बिघाड झाला होता. त्यामुळे त्यांना नियोजित दौरा रद्द करावा लागला होता.
Join Our WhatsApp Community