महाविकास आघाडीच्यावतीने काढण्यात आलेल्या हल्लाबोल महामोर्चात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या सहभागी झाल्या होत्या. रश्मी ठाकरे यांची उपस्थिती हा या महामोर्चामधील चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीवरुन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटा काढत या मोर्चाचा उद्देश भावी महिला मुख्यमंत्री लाँच करण्यासाठी होता की महाराष्ट्र हितासाठी होता असा सवाल केला आहे. तसेच दादा. . नाना जागे व्हा, महत्वाकांक्षा ओळखा असाही सूचक इशारा दिला आहे.
राज्यातील महापुरुषांबाबत वारंवार अवमानकारक विधाने करणाऱ्या नेत्यांच्या विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व इतर पक्षांच्यावतीने शनिवारी हल्लाबोल महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. महाविकास आघाडीच्यावतीने काढलेल्या या मोर्चात माजी मुख्यमंत्री व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी उध्दव ठाकरे यांनी एका कार्यक्रमांत बोलतांना राज्यात महिला मुख्यमंत्री देण्याबाबतचे विधान केले होते. त्यावेळी ठाकरे यांच्या मनातील ती महिला मुख्यमंत्री कोण अशी चर्चा झाली होती. त्यानंतर महाविकास आघाडीच्या महामोर्चात रश्मी ठाकरे सहभागी झाल्या आणि त्यांची उपस्थिती ही सर्वांसाठी आश्चर्यकारक अशीच होती.
विशेष म्हणजे आजवर शिवसेनेच्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावणाऱ्या रश्मी ठाकरे यांनी कधीही अशाप्रकारच्या आंदोलनात किंवा मोर्चात सहभाग नोंदवला नव्हता. तसेच हा मोर्चा महाविकास आघाडीच्यावतीने काढण्यात येणार असल्याने यामध्ये रश्मी ठाकरे सहभागी होण्याची शक्यताही कमीच होती. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी महिला मुख्यमंत्री देण्याचा विचार व्यक्त केल्यानंतर अशाप्रकारच्या महाविकास आघाडीच्या महामोर्चात रश्मी ठाकरे यांची उपस्थिती ही सर्वत्रच चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या उपस्थितीवरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या दादा आणि नानांना सूचक इशारा दिला आहे. नितेश राणे यांनी केलेल्या या ट्विटमध्ये आजच्या महाआघाडीच्या हल्लाबोल मोर्चाचा उद्देश भावी महिला मुख्यमंत्री लाँच करण्यासाठी होता की महाराष्ट्र हितासाठी होता असा सवाल केला आहे. तसेच दादा. . नाना जागे व्हा, महत्वाकांक्षा ओळखा असाही सूचक इशारा दिला आहे. या मोर्चात रश्मी ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेही आघाडीवर होत्या. त्यामुळे दोन्ही महिला नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाची चुरस लागलेली आहे.
तेजसची हजेरी
या मोर्चात उध्दव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांनीही हजेरी लावली. आई रश्मी ठाकरे यांच्यासह तेजसनेही या मोर्चा सहभागी होत आपले दर्शन तिन्ही पक्षांच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चातील उपस्थितांसह माध्यमांना घडवले.
Join Our WhatsApp Community