शेतकऱ्यांच्या सर्वांत जास्त आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. शेतकरी उगाच आत्महत्या करत नाही. देशाला धान्य, जीवनदान देणारा शेतकरी आत्महत्या करत आहे हे सर्व दुःखद आहे. देशातील शेतकऱ्यांच्या शेतात धान्य उगवण्याच्या जागी मृत शेतकऱ्यांचे मृतदेह उगवत आहेत. आता ही सत्ता हटवण्याची वेळ आली असून शेतकऱ्यांनी हातात लेखणी घेऊन कायदा बनवण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच अबकी बार किसान सरकार हा नारा आम्ही दिला असल्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले.
मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीतर्फे (बीआरएस) महाराष्ट्रात मोर्चेबांधणी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी, ५ जानेवारीला नांदेडमध्ये पहिली सभा पार पडली. यावेळी अहेरीतील माजी आमदार दीपक आत्राम यांनी केसीआर यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात प्रवेश केला.
देशात आज परिवर्तनाची आवश्यकता
राव पुढे म्हणाले की, देशात आज परिवर्तनाची आवश्यकता आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. या दरम्यान देशात अनेकदा सरकार बदलली. अनेक नेते, आमदार, खासदार बदलले. अनेकांनी मोठी आश्वासने दिली. मात्र, आज देशात पिण्यासाठी पाणी नाही, शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी पाणी नाही, गरिबांना आज वीज देखील मिळत नाही. त्यामुळे या गोष्टी आपण समजून घेऊन एकत्र लढा दिला पाहिजे. देशात आज ४२ टक्के शेतकरी आहेत. त्यात आणखी शेतमजुरांची संख्या जोडली, तर ही आकडेवारी ५० टक्क्यांच्या वर जाते आणि सरकार बनवण्यासाठी एवढी संख्या पुरेशी आहे. फक्त आपल्याला जाती धर्माच्या आधारे न लढता, एकत्र येऊन काम करावे लागेल. तसेच भारत हा बुद्धिजीवींचा देश असून बुद्धू लोकांचा देश नाही, असेही ते म्हणाले.
देशातील परिस्थितीला भाजप-काँग्रेस जबाबदार
देशाच्या स्वातंत्र्यानंतर १६ वर्षे भाजपची आणि उर्वरित काळात काँग्रेसची सत्ता होती. दोन्ही पक्षांनी देशासाठी काय केलं? देशातील या परिस्थितीला भाजप आणि काँग्रेस जबाबदार आहेत. सरकार फक्त भाषणबाजीत वेळ घालवत आहे. कोणाला अंबानी तर कोणाला अदानी पाहिजे. मेक इन इंडिया जोक इन इंडिया झाला आहे, अशी टीकाही राव केली.
(हेही वाचा – ठाण्यात राष्ट्रवादीला पडणार मोठं खिंडार; माजी नगरसेवकांनी खासदार श्रीकांत शिंदेंची घेतली भेट)
भारत बाजार का लागत नाही?
दिवाळीचे दिवे, तिरंगा, लायटिंग, रंग हे सर्व चीनमधून येत आहेत. हे सर्व भारतात कसे येत आहे? भारतात चायना बाजार कसा लागतो? भारत बाजार का लागत नाही? देशात सध्या फक्त मन की बात, इसकी बात, उसकी बात यावरच भाषण सुरू आहे. त्यामुळेच देशातील बदलाची आवश्यकता लक्षात घेऊन बीआरएसचे विस्तारीकरण करत असल्याचेही ते म्हणाले.
म्हणून सरकारवर विश्वास करू शकत नाही!
महाराष्ट्रात अनेक नद्या आहेत तरी देखील मराठवाड्यात पाणी नाही. देशातील कृषी योग्य भूमी ४१ कोटी एकर आहे. या सर्व शेतात पाणी जायला हवं. समुद्रात जाणारं पाणी शेतात यायला पाहिजे. परंतु, सरकार यावर काहीच काम करत नाही. त्यामुळे या सरकारवर आपण विश्वास करू शकत नाही, असा टोलाही राव यांनी यावेळी लगावला.
भारत अमेरिकेपेक्षा श्रीमंत
आपला देश अमेरिकेपेक्षा श्रीमंत आहे. भारतात संपत्ती आहे, पण त्यापासून जनता वंचित आहे. या देशात पाणी, कोळसा, जमीन असं सगळं आहे. अमेरिका, चीन हे आपल्या देशापेक्षा मोठे आहेत, पण त्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन फार कमी आहे. हे सर्व आकडे माझे नाहीत तर हे सरकारचे आहेत.
Join Our WhatsApp Community