मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्या सभांचा तडाखा लावल्यामुळे मनसेला आगामी महापालिका निवडणुकांमध्ये चांगले यश मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. पण आता कल्याण-डोंबिवलीत मनसेला शिवसेनेने चांगलाच दणका दिल्याची माहिती मिळत आहे. कल्याण-डोंबिवलीतील माजी नगरसेवकांसह एकूण 10 जण मनसेला जय महाराष्ट्र म्हणत शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या तारखांआधीच कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या अडचणी वाढल्या आहेत.
(हेही वाचाः राज ठाकरेंच्या दाव्याला पुष्टी, मशिदींवरील भोंग्यांबाबत हिंदूंपेक्षा जास्त मुस्लिमांच्या तक्रारी)
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मनसेचे माजी नगरसेवक प्रकाश माने आणि पूजा गजानन माने यांच्यासह 10 जण शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे नेते शिवबंधनात अडकणार असल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी हा पक्षप्रवेश होणार आहे. यामुळे कल्याण-डोंबिवलीत मनसेला मोठे खिंडार पडले आहे.
शिवसेनेची ताकद वाढणार
सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी विविध डावपेच आखल्याची माहिती मिळत असून, त्याचाच भाग म्हणून मनसेचे नेते शिवसेनेत येत असल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचाः राज ठाकरेंची सभा झालेली जागा ‘या’ खेळासाठी आहे प्रसिद्ध)
Join Our WhatsApp Community