भूसंपादनाआधीच मेट्रो कारशेड उभारण्यासाठी निविदा, कांजूरमार्ग आणि मोगरापाड्यातील जागेचा तिढा कायम

137

बहुचर्चित वडाळा ते कासारवडवली (ठाणे) मेट्रो-४च्या कारशेडसाठी अद्याप जागा निश्चित झालेली नसताना कारशेड उभारणीसाठी निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वडाळा-घाटकोपर-ठाणे मेट्रो ४, दहिसर ते मीरा रोड मेट्रो ९ आणि लोखंडवाला ते कांजूरमार्ग मेट्रो ६ या तिन्ही मार्गांच्या कारडेपोचा तिढा अजून सुटलेला नाही. परंतु, एमएमआरडीएने मेट्रो ४ मार्गाच्या कारडेपोचे काम मार्गी लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी निविदा मागवल्या असून येत्या चार महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

मेट्रो ४ चा कारडेपो मोगरापाडा येथे हलविण्याचा निर्णय घेतला

मेट्रो ४ मार्गासाठी कांजूरमार्ग येथे कारडेपो उभारला जाणार होता. मात्र ही जागा वादग्रस्त ठरली आहे. या जागेवरून तत्कालीन ठाकरे सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारमध्ये वाद झाला होता. शिवाय या जागेचा तिढा न्यायालयातही गेला होता. त्यामुळे मेट्रो ४ चा कारडेपो मोगरापाडा येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु तेथेही स्थानिकांनी विरोध केल्याने एमएमआरडीए पुढे पेच निर्माण झाला आहे. स्थानिकांचे आक्षेप दूर करणे आणि त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात योग्य ती भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने काही पर्याय ठेवले आहेत. जमीनधारकांना विकसित किंवा अविकसित भूखंड देणे, भूखंडावर दुप्पट एफएसआय, असा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव स्थानिकांच्या पसंतीस उतरेल, अशी राज्य सरकारला आशा आहे. तसे संकेत मिळाल्यामुळेच एमएमआरडीएने कारडेपोच्या कामासाठी निविदा मागवण्याचे पाऊल उचलले आहे. एमएमआरडीएने कारडेपोसाठी ७०० कोटी रुपयांची निविदा काढली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्त करण्यात येणाऱ्या कंत्राटदाराने तीन वर्षांत कारडेपोचे काम पूर्ण करून द्यायचे आहे, अशी माहिती ‘एमएमआरडीए’मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

(हेही वाचा गुजरातमध्ये झुलता पूल दुर्घटनेत मृतांचा आकडा पोहचला ६० वर)

नेमके कारण काय?

मोगरापाडा येथील जमीन देण्यास स्थानिक राजी होतील, अशी एमएमआरडीएला अपेक्षा आहे. त्यामुळेच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, भूसंपादन करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. जागा ताब्यात आल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू केल्यास कारडेपो उभारणीस आणखी विलंब लागेल. त्यामुळे जमीन संपादन आणि निविदा प्रक्रिया दोन्ही एकाच वेळेस सुरू केल्याची माहिती या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

३२.३२ किलोमीटरचा मार्ग

  • वडाळा, घाटकोपर, ठाणे मेट्रो ४ हा ३२.३२ किलोमीटरचा मार्ग असून या मार्गात ३२ स्थानके आहेत.
  • प्रकल्पासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
  • २०१८ साली या मार्गाच्या उभारणीला सुरुवात झाली. मात्र अजून निम्मे कामही पूर्ण झालेले नाही.
  • ९ मेट्रो मार्गांकरिता ३० हजार ४८३ कोटींचे कर्ज
  • मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महत्वाकांक्षी मेट्रो मार्गिका हाती घेतल्या आहेत.
  • सद्यस्थितीत प्रगतीपथावर असलेल्या व प्रस्तावित मेट्रो मार्गिकांपैकी ९ मेट्रो मार्गिकांसाठी निधी उभारण्याकरीता केंद्र सरकारच्या आर.ई.सी. लिमिटेडकडून ३० हजार ४८३ कोटींचे कर्ज घेण्यात आले आहे.
  • त्यातील १४ हजार ४३४ कोटी विद्युत आणि यांत्रिकी व संबंधित कामांकरीता, तर १६ हजार ४९ कोटी रुपये विद्युत आणि यांत्रिकी कामांकरीता आहेत.
  • नुकतेच या कर्जाच्या करारपत्रांवर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन्ही संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

(हेही वाचा देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचालींना वेग, काय म्हणतात तज्ज्ञ?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.