मुंबईतील चर बुजवण्यासाठी सुमारे ५०० कोटींच्या निविदा

पुढील तीन वर्षांसाठी सुमारे ५०० कोटी रुपयांची निविदा मागवण्यात आली आहे.

मुंबईत सेवा सुविधांचे जाळे टाकण्यासाठी खोदले जाणारे चर बुजवण्याचे दोन वर्षांचे कंत्राट, मागील जानेवारी २०२१ मध्ये संपुष्टात आले. त्यामुळे यासाठीची निविदा काढून चर बुजवण्यासाठी नवीन कंत्राटदारांची निवड करण्याऐवजी त्यांच्याशी हातमिळवणी करत प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधींनी त्यांना डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली. एका बाजूला चर बुजवणाऱ्या कंत्राटदारांना कोविडच्या नावाखाली लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न झाल्यानंतर, आता पुढील तीन वर्षांसाठी सुमारे ५०० कोटी रुपयांची निविदा मागवण्यात आली आहे.

कंत्राटदारांची झोळी भरण्यासाठी

विशेष म्हणजे ज्या बुजवलेल्या चरींचे ऑडिट करण्याचे आदेश तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी दिले होते, त्या चरींचे ऑडिट वगैरे सर्व बाजूला ठेवत कंत्राटदारांची झोळी भरण्यासाठी महापालिका रस्ते विभागातील अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधींनीही कंबर कसत या सर्वांना कशाप्रकारे मुदतवाढ मिळेल, यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे दिसून येतात.

मुदतवाढ करण्याची विनंती

मुंबईतील विविध अंतर्गत व बाह्य उपयोगिता सेवा संस्थांकडून घेतलेल्या चरांच्या पुनर्भरणीचे काम करण्यासाठी दोन वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्याकरता स्थायी समितीने २ जानेवारी २०१९ रोजी मंजुरी दिली. परंतु संपूर्ण मुंबईत नेमलेल्या या कंत्राटदारांनी महापालिका आयुक्तांना संयुक्त निवेदन सादर करुन, कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर तसेच इतर कारणास्तव चरांच्या पुनर्भरणीच्या कामाच्या कंत्राटाचा कालावधी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवण्याची विनंती केली आहे.

(हेही वाचाः दादर चैत्यभूमीप्रमाणेच गिरगाव चौपाटीवरही पर्यटकांसाठी पाहणी कट्टा)

कंत्राटदारांनी मुदतवाढ मिळवली

या कंत्राटाचा कालावधी २९ जानेवारी २०२१ रोजी संपुष्टात आला होता. त्यामुळे शासन निर्णयानुसार कोविडच्या पार्श्वभूमीवर या कंत्राटाचा कालावधी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढवण्याचा निर्णय स्थायी समितीने निवेदन मंजूर करत घेतला होता. विशेष म्हणजे जानेवारी महिन्यात चर खणण्याचे कंत्राट संपुष्टात येत असल्याने, रस्ते विभागाने याची निविदा मागवण्याकरता २०२० मध्ये प्रयत्न केला होता. पण कंत्राटदारांनी प्रशासनावर दबाव आणत तसेच शासनाच्या परिपत्रकाचा आधार घेत ही मुदतवाढ मिळवली होती.

असा आहे अंदाजित खर्च

आता रस्ते विभागाने ५ जुलै २०२१ रोजी निविदा संदर्भात जाहिरात प्रसिध्द केली. यामध्ये मुंबईतील सात परिमंडळांमध्ये चर बुजवण्यासाठी कंत्राटदारांची निवड करण्यासाठी निविदा मागवली आहे. यामध्ये सर्व परिमंडळांमध्ये एकूण ५०५ कोटी रुपयांच्या अंदाजित कंत्राट कामांसाठी निविदा मागवण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक अंदाजित खर्च हा परिमंडळ-७ म्हणजेच उत्तर मुंबईतील दहिसर, बोरीवली आणि कांदिवली या विभागांसाठी अंदाजित खर्च हा ९५ कोटी रुपयांचा आहे. त्याखालोखाल परिमंडळ-४ अर्थात विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम हा के-पश्चिम विभाग, गोरेगाव पी-दक्षिण विभाग आणि मालाड पी-उत्तर विभागांमधील चर बुजवण्याच्या कामांसाठी ९० कोटी रुपयांचा अंदाज बांधण्यात आला आहे. तर सर्वात कमी चर बुजवण्यासाठीचा खर्च परिमंडळ-६ साठी अंदाजित करण्यात आला आहे. घाटकोपर ते मुलुंड या भागासाठी ३५ कोटी रुपयांचा अंदाज बांधण्यात आला आहे. इतर सर्व परिमंडळांमध्ये सरासरी ७० कोटी रुपयांचा अंदाज आहे.

(हेही वाचाः नेपियन्सी रोड, बाबूलनाथ परिसरातील डोंगराळ भागात दरड कोसळण्याचा धोका)

तीन वर्षांसाठी कंत्राट

त्यामुळे जुलै महिन्यांमधील निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थायी समितीची मंजुरी आदींची प्रक्रिया पूर्ण करुन पुढील वर्षी जानेवारीपासून या कंत्राटदारांची निवड होणे अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. सध्या चर बुजवणाऱ्या कंत्राटदारांना डिसेंबर २०२१ पर्यंत मुदत असून, त्या आधी प्रक्रिया पूर्ण झाल्यास प्रशासन आधीच्या कंत्राटदारांना बाजूला करुन आधीच कामे सोपवतात की, नवीन कंत्राटदारांना मुदत संपुष्टात आल्यानंतर कामे करुन घेतली जातील, याबाबत प्रशासनाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. हे कंत्राट तीन वर्षांसाठी पावसाळ्यासहित याचा कालावधी असल्याचे रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here