भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणी बागेत) परदेशातून दुर्मिळ प्राणी आणणे तसेच प्राण्यांसाठी पिंजरे बांधण्याच्या निविदेमध्ये अनियमितता आढळून आल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीनंतर आता महापालिका प्रशासनाने निविदाच रद्द केली आहे. या निविदेतील कंत्राटात १०६ कोटी रुपयांची अनियमितता झाल्याचा आरोप भाजपने केला. त्यानंतर प्रशासनाने बॅकफूटवर येत हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी आणि स्कायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला देऊ केलेले कंत्राट तडकाफडकी रद्द केले. त्यामुळे या संपूर्ण निविदा प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांचे आणि सत्ताधाऱ्यांचे वर्तन संशयास्पद असल्याने त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे व पक्षनेते विनोद मिश्रा यांनी केली आहे.
( हेही वाचा : आमदारांना हक्काची घरे मग सरकारी कर्मचाऱ्यांना का नाही? )
जिजामाता उद्यानातील विकासकामांची पाहणी
राणीबागेतील पिंजऱ्यांच्या कामांच्या निविदा रद्द करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे, माजी पक्षनेते विनोद मिश्रा, प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी जिजामाता उद्यानातील विकासकामांची पाहणी केली. कामाचे आकडे फुगवून काढलेल्या निविदामुळे महापालिकेचे नुकसान होणार होते. तरीही ठराविक कंत्राटदाराच्या फायद्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. नियमानुसार १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चासाठी जागतिक निविदा मागवाव्या लागतात. मात्र, महापालिकेने १८५ कोटी रुपयांच्या संपूर्ण प्रक्रियेची विभागणी तीन निविदांमध्ये केली होती.
१८० कोटींच्या कामाचे आकडे फुगवून २८० कोटींवर नेण्यात आले होते. त्यामुळे महापालिकेचे शंभर कोटी रुपयांचे नुकसान झाले असते. याचा अर्थ मर्जीतील कंत्राटदाराला काम देण्यासाठी हा सगळा खटाटोप सत्ताधारी शिवसेनेने केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. राणी बागेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोयी सुविधा मिळाव्यात आमची मागणी असून विकासकामे पारदर्शी पद्धतीने होणे गरजेचे आहे. बागेतील कुठल्याही विकास कामात होणारा भ्रष्टाचार भाजपा खपवून घेणार नाही असा इशारा प्रभाकर शिंदे यांनी यावेळी दिला. तर ही निविदा प्रक्रिया पुन्हा राबवण्याची मागणी पक्षनेते विनोद मिश्रा यांनी केली. यावेळी माजी नगरसेवक कमलेश यादव, आकाश पुरोहित, माजी नगरसेविका राजेश्री शिरवडकर, सुरेखा लोखंडे आदी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community