‘दहशतवाद फूट पाडतो, पर्यटन एकत्र आणते’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताचा पर्यटनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन प्राचीन संस्कृत श्लोक ‘अतिथी देवो भवः’ यावर आधारित आहे.

220
'दहशतवाद फूट पाडतो, पर्यटन एकत्र आणते' - पंतप्रधान नरेंद्र मोदी

दहशतवाद फूट पाडतो, मात्र पर्यटन सगळ्यांना एकत्र आणते.’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात आयोजित जी-20 पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीला व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित केले. बैठकीतील मान्यवरांना महत्वाच्या चर्चेतून थोडा वेळ काढून गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि आध्यात्मिक बाजू पाहण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताचा पर्यटनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन प्राचीन संस्कृत श्लोक ‘अतिथी देवो भवः’ यावर आधारित आहे. याचा अर्थ ‘अतिथी म्हणजे देवाचे रूप ’ असा आहे. पर्यटन म्हणजे केवळ प्रेक्षणीय स्थळे पाहणे नाही तर तो एक विलक्षण अनुभव आहे. संगीत असो वा खाद्यपदार्थ, कला असो किंवा संस्कृती, भारतातील विविधता खरोखरच ऐश्वर्य संपन्न आहे. उंच हिमालयापासून ते घनदाट जंगलांपर्यंत, कोरड्या वाळवंटापासून ते सुंदर समुद्रकिनारे, साहसी खेळांपासून ते ध्यान स्थळांपर्यंत, भारतामध्ये प्रत्येकासाठी काहीतरी आहे असे पंतप्रधान म्हणाले. भारत आपल्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळात देशभरातील 100 वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास 200 बैठका आयोजित करत आहे आणि प्रत्येक बैठकीच्या वेळी वेगळी अनुभूती देत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

(हेही वाचा –पंतप्रधान नरेंद्र मोदी, शहा आणि नितीश कुमारांना ठार मारण्याची धमकी)

पर्यटन क्षेत्रासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करताना भारताचे प्रयत्न समृद्ध वारसा जतन करण्यावर केंद्रित आहेत. भारत जगातील प्रत्येक प्रमुख धर्माच्या यात्रेकरूंना आकर्षित करतो हे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी आध्यात्मिक पर्यटनाच्या विकासावर भर दिला.वाराणसी हे प्राचीन काळापासून असलेले शहर प्रमुख आध्यात्मिक केंद्रांपैकी एक आहे. या शहरात पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्यामुळे यात्रेकरूंच्या संख्येत दहा पटीने वाढ झाली असून आजघडीला त्यांची संख्या 7 कोटी झाली आहे. भारत पर्यटनासाठी नवीन आकर्षणे निर्माण करत आहे हे त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीचे उदाहरण देऊन सांगितले. हा जगातील सर्वात उंच पुतळा असून अनावरण झाल्यानंतर एका वर्षातच सुमारे 2.7 दशलक्ष पर्यटक या स्थळाला भेट द्यायला आल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

हरित पर्यटन, डिजिटलायझेशन, कौशल्य विकास, पर्यटन क्षेत्रातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि पर्यटन स्थळांचे व्यवस्थापन ही एकमेकांशी जोडलेली पाच प्राधान्य क्षेत्रे भारताच्या तसेच ग्लोबल साउथच्या प्राधान्यक्रमांना प्रतिबिंबित करतात यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.पर्यटनात समाजातील सर्व क्षेत्रातल्या, सर्व स्तरातल्या लोकांना एकत्रित आणण्याची आणि त्याद्वारे सौहार्दपूर्ण समाज निर्माण करण्याची क्षमता आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संस्थेच्या भागीदारीतून जी-20 पर्यटन डॅश बोर्ड विकसित केला जात असून, विविध देशांमधील उत्तम पद्धती, पर्यटनाशी संबंधित अध्ययन/अहवाल आणि प्रेरणादायक कथा एकत्रित आणणारा हा अशा प्रकारचा पहिलाच प्लॅटफॉर्म ठरेल, असे त्यांनी सांगितले.

ह्या चर्चा आणि ‘गोवा आराखडा’ पर्यटनाच्या परिवर्तनात्मक शक्ती प्रत्यक्षात आणण्यासाठीच्या एकत्रित प्रयत्नांना कित्येक पटींचे बळ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताच्या जी-20 अध्यक्षपदाचे ब्रीदवाक्य, “वसुधैव कुटुंबकम’ म्हणजे एक पृथ्वी, एक कुटुंब असे आहे, हे ब्रीदवाक्यच भविष्यात जागतिक पर्यटनाचे ब्रीदवाक्य ठरू शकते असे मोदी म्हणाले.गोव्यात लवकरच होणाऱ्या सांजाव महोत्सवाचा उल्लेख केला आणि भारत हा उत्सवप्रिय देश असल्याचे नमूद केले. तसेच, पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांचा संदर्भ देत पंतप्रधानांनी मान्यवरांना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा हा उत्सव बघण्याचे आवाहन केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.