मुंबईतील टेक्स्टाईल आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्यात येणार असल्याचे समोर आले होते. त्यामुळे मुंबईतून अनेक महत्वाच्या संस्था अन्य राज्यात हलविण्यात येत असल्याने मुंबईचे महत्व कमी करण्यात येत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला होता. विधीमंडळातही आरोप प्रत्यारोप झाले होते. मात्र, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळत मुंबईतील टेक्स्टाईल आयुक्त कार्यालय दिल्लीला हलविण्यात येणार नसल्याची माहिती विधानसभेत मंगळवारी दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अतिरिक्त सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील टेक्स्टाईल आयुक्त कार्यालय दिल्लीला हलविण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. मुंबईतील कार्यालयात ५०० कर्मचारी आहेत. केवळ टेक्स्टाईल आयुक्त आणि पाच अधिकाऱ्यांना दिल्ली मुख्यालयात काही दिवस काम करायला सांगितले आहे. टेक्स्टाईल मंत्रालयाची पुनर्बांधणी आणि सक्षमीकरण तसेच टेक्स्टाईल उद्योगाला काही सवलतीच्या योजना आखण्यासाठी त्यांना काही दिवस दिल्लीत काम करायला सांगितले आहे. त्यामुळे मुंबईतील कार्यालय हलविण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही, असे स्पष्ट केले.
टेक्स्टाईल आयुक्त केंद्रीय वस्रोद्योग मंत्रालयाला प्रधान तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत असतो. देशातील अमृतसर, नोयडा, इंदूर, कोलकाता, बंगळुरू, कोईमतूर, नवी मुंबई आणि अहमदाबाद येथील प्रादेशिक कार्यालयाच्या मदतीने आर्थिक सर्व्हेक्षण करून टेक्सटाईल इंडस्ट्रीच्या आर्थिक स्थितीबाबत सल्ला देण्याचे काम टेक्सटाईल कमिशनर करीत असतो.
(हेही वाचा – दादा भुसेंच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर; म्हणाले, दाढीला आग लागण्याचे…)
Join Our WhatsApp Community