केरळमुळे ठाकरे सरकार अलर्ट, मंत्रिमंडळात ‘या’ विषयावर झाली चर्चा

सरकार १२०० डॉक्टर्स घेत आहे, ५ सप्टेंबरच्या अगोदर त्यांचे समुपदेशन होऊन त्यांना आदेश दिले जातील. सुपर क्लास वन यांची एमपीएससीकडून भरती होत आहे.

130

केरळ राज्यात शनिवारी साजऱ्या झालेल्या ओणम उत्सवानंतर  एका दिवशी तब्बल ३१ हजार कोरोना रूग्ण वाढले. यामुळे राज्य सरकार सतर्क झाले असून, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केरळच्या आरोग्यमंत्र्यांना फोनवर संपर्क साधला.

काय म्हणाले राजेश टोपे?

तिसरी लाट केरळपासून सुरु होते कि काय, असा प्रश्न घेऊन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे  यांनी केरळच्या आरोग्य मंत्र्यांना फोनवर संपर्क साधला असता गर्दीमुळे रूग्ण वाढ झाली असल्याचे निश्चित उत्तर मिळाले. तिसऱ्या लाटेच्या संदर्भात आज मंत्रीमंडळात चर्चा झाली, केरळच्या पार्श्वभूमीवर जिथे ओणम साजरा झाला तिथे मोठी गर्दी झाली त्याचा परिणाम जाणवतो. मी स्वतः केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी बोललो आहे, फोनवर बोललो. ३१ हजार केसेस एका दिवशी आल्यात त्याची कारणं काय? आणि केरळपासून तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली असे समजायचे का? असे विचारले असता त्यांनी ओणम सणामुळे आणि दुसरे चाचण्यांची संख्या वाढविली आहे, त्यामुळे संख्या वाढली आहे. तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी राज्याने पूर्ण तयारी केली आहे. जून महिन्यात केंद्र शासनाने सांगितले की, जून महिन्यात तिसरी लाट येऊ शकेल. त्यात ६० लाख लोक बाधित होऊ शकतील आणि त्याच्या टक्केवारीत १२ टक्के ऑक्सिजन बेड लागतील, मात्र दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता ही जी आकडेवारी आहे त्याला धरून तयारी करीत आहोत, असेही टोपे म्हणाले. 

(हेही वाचा : युवा सेनेचे ‘ते’ आंदोलन शिवसैनिकांच्या जिव्हारी!)

१०० टक्के रिक्त जागांवर भरतो 

सरकार १२०० डॉक्टर्स घेत आहे, ५ सप्टेंबरच्या अगोदर त्यांचे समुपदेशन होऊन त्यांना आदेश दिले जातील. सुपर क्लास वन यांची एमपीएससीकडून भरती होत आहे. अ, ब, क, ड वर्ग रिक्त पदे भरती होणार आहे. ऑक्सिजन १२०० ते १३०० मेट्रिक टन पूर्वी उपलब्धता असायचा आता २००० मेट्रिक टन पर्यंत क्षमता वाढवली आहे. जुलैच्या अधिवेशनात आर्थिक तरतूद करून घेतली आहे, औषधे, आवश्यक उपकरणे घेतली जातील. एक हजार रुग्णवाहिका खरेदी केल्या, ५०० रुग्णवाहिका दिल्या आहेत तर उर्वरित ५०० सप्टेंबरअखेर प्रत्येक आरोग्य केंद्रांपर्यंत जाणार आहेत. महाराष्ट्रात १०० टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रे, रुग्णालये, जिल्हा रुग्णालयांना रुग्णवाहिका मिळतील. एशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्या वतीने जो प्रस्ताव पाठवला आहे, ५ हजार कोटींचा, त्यात आपल्या आरोग्य संस्थांच्या बांधकामांसाठी कर्ज घेण्याचा विषय आहे. त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. जे आकडे सांगितले जात आहेत, त्यांना धरूनच आपण सर्वतोपरी काळजी घेत आहोत, असे टोपे म्हणाले. 

१३ लाख ॲक्टिव्ह रुग्ण असतील  

पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले, दुसऱ्या लाटेत ४० लाख बाधित झाले आणि तिसऱ्या लाटेत ६० लाख लोक बाधित होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात १२ टक्के लोकांना ऑक्सिजन लागतो. गेल्या वेळी एका वेळी साडेसहा लाख ॲक्टिव्ह रुग्ण होते, आता १३ लाख ॲक्टिव्ह रुग्ण असतील, असा अंदाज व्यक्त होतो आहे, अंदाजित आकडेवारी आहे, त्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व तयारी करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. म्हणूनच ‘सिरो सर्व्हेलन्समध्ये परफॉर्मन्स ऑफ स्टेटसची तुलना केली जाते. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात किती लोक बाधित झाले आहेत, त्याचा सिरो सर्व्हिलन्सचा रिपोर्ट देशस्तरावर आलेला आहे.  त्यात कमी बाधित केरळ आहे ४२ टक्के, त्या खालोखाल ५५ टक्के महाराष्ट्र आहे परंतु मध्यप्रदेश ८९ टक्के बाधित आहे, असे अहवालातून दिसते.

तिसऱ्या लाटेत मृत्यू दर कमी 

मंत्रीमंडळाने आज ७१ हजार आशा स्वयंसेविका ३६०० गट प्रवर्तक आहेत त्यातील आशा स्वयंसेविकांना १५०० रुपये तर गटप्रवर्तकांना १७०० रुपये वाढ देण्यात येणार आहे. दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांचा यासाठी खर्च येणार आहे, त्याला आज मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. जुलैपासून पगार वाढ होऊन तो दिल्या जाईल. लहान मुलांच्या संदर्भांने पहिल्या व दुसऱ्या लाटेची बाधित टक्केवारी ही ८ ते १० टक्के आहे. लसीकरणाच्या मुद्यावर मंत्रिमंडळात सविस्तर चर्चा झाली, आमचा पाठपुरावा लक्षात घेता केंद्राने सप्टेंबर महिन्यात १ कोटी ७० लाख डोसेस देण्याचे मान्य केले आहे. ५० लाख डोसेस जास्तीचे मिळतील त्याचा उपयोग लसीकरणासाठी होईल, एक नक्की आहे पहिला डोस दिला की दुस्ऱ्या डोसला प्राधान्य देतो, येणाऱ्या ज्या लसी असतील त्या अशा फॉर्म्युल्याने वितरित केली जाईल,  ग्रामीण भागात मागणीप्रमाणे पुरवठा केला जाईल. तिसऱ्या लाटेसाठी लसीकरण हा रामबाण उपाय आहे. लसीकरणाला गती दिली तर तितकी गंभीरता राहणार नाही. तिसरी लाट अमेरिका, युके, रशिया इथे सुरु आहे, त्यात मृत्यूदर उतरतो आहे, लसीकरणाचा परिणाम यावर असू शकेल, महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात किमान ५२ टक्क्यांपर्यंत लोकसंख्या पहिला डोस दिला आहे, उरलेले ४८ टक्के लोकसंख्या लवकर पूर्ण करायचा आहे, असेही टोपे म्हणाले. 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.