बहुमत चाचणीच्या आधी मंत्रिमंडळ बैठक! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव मंजूर

100

महाविकास आघाडी सरकारला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याचा आदेश दिला. त्यामुळे ठाकरे सरकार या चाचणीत कोसळणार आहे, अशी स्थिती आहे. म्हणून ठाकरे सरकारची बुधवारी, २९ जून रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली. ही बैठक या सरकारची शेवटची बैठक असावी, असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. या बैठकीत ठाकरे सरकारने बहुतांश प्रलंबित नामकरणाचे प्रस्ताव मंजूर केले. त्यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

काँग्रेसचा होता विरोध

याआधीही शिवसेनेकडे या नामांतराची मागणी होत होती, मात्र याला काँग्रेसकडून विरोध होत होता, त्यामुळे शिवसेनेला महाविकास आघाडी सरकारमध्ये हे करणे शक्य झाले नव्हते. मात्र आता सरकार शेवटची घटका मोजत आहे, त्यामुळे शिवसेनेने औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मांडला. त्याला काँग्रेसने सुरुवातीला विरोध केला होता. हा विषय महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना जो किमान सामान कार्यक्रम तयार केला होता, त्या अंतर्गत नाही, असे मत काँग्रेसने मांडले होते. मात्र तरीही या बैठकीत औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

(हेही वाचा मंत्रिमंडळाची बैठक की बारशाचा कार्यक्रम? नामांतराचे भरमसाठ प्रस्ताव)

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव

याचा बैठकीत उस्मानाबाद शहराचे नामकरण धाराशीव असे करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, तोही प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच नवी मुंबई येथील आंतर राष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तो प्रस्तावही मंजूर करण्यात आला.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्याच लोकांनी मला दगा दिला, त्यामुळे अशी नामुष्की ओढवली आहे. आजपर्यंत तुम्ही जे सहकार्य केले त्याबद्दल आपले आभार. ज्या खात्यांचे प्रस्ताव या बैठकीत मंजूर झाले नाहीत, त्यांचे प्रस्ताव पुढील बैठकीत मंजूर करण्यात येतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.