टिपू सुलतानसाठी ठाकरे सरकारकडून हिंदुत्वनिष्ठांचा ‘बळी’

111

मालाड मालवणी येथील खेळाच्या मैदानाला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव देण्याचा घाट ठाकरे सरकारने घातला, याला हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाजपकडून कडाडून विरोध झाला. मात्र दोन्ही काँग्रेसच्या वळचणीला बसलेल्या शिवसेनेने यामध्ये टिपू सुलतानचे नाव मैदानाला देण्याचा हट्ट पूर्ण केलाच, शिवाय याला विरोध करणाऱ्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून मुस्लिमांना खुश करण्याचाही प्रयत्न केला. यामुळे सेनेच्या प्रती हिंदुत्वनिष्ठांमध्ये तीव्र नाराजीचा सूर पसरल्याचे दिसत आहे.

५९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

ठाकरे सरकारने या मैदानाला टिपू सुलतानचे नाव देवून त्या मैदानाचे उद्घाटन पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी केले. त्याआधी मालवणी परिसरात बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि भाजपचे कार्यकर्ते यांनी याला तीव्र विरोध करत आंदोलन केले होते. या आंदोलन प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्याने या सर्व कार्यकर्त्यांसह भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार अतुल भातखळकर यांच्यासह ५९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात केले आहेत.

दंगलसदृश परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप

या आंदोलनाच्या वेळी कार्यकर्ते यांनी हातात भगवे झेंडे व निषेधाचे बॅनर घेऊन मैदानात जाऊन ‘जय श्रीराम’, ‘भारत माता की जय’, ‘ अस्लम भाई चोर है’, ‘ अस्लम भाई मुर्दाबाद’, ‘हिंदू राष्ट्र संकटात आहे, हिंदू धर्म संकटात आहे’, अशा घोषणा देण्यात सुरुवात केली होती. दरम्यान पोलिसांनी या आंदोलकांना आवरण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली होती. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार अतुल भातखळकर यांच्यावर दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणे, रास्ता रोको करणे, कोरोना नियमांचे उल्लंघन करणे या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.