नेत्यांच्या घरांवरील हल्ल्याचा पायंडा ठाकरे सरकारनेच पाडलाय : नितेश राणेंचा प्रहार

94

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष,खासदार शरद पवार यांच्या सिल्व्हर अपार्टमेंटवर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर अशाप्रकारे कोणत्याही नेत्यांच्या घरांवर हल्ला होऊ नये अशा प्रतिक्रिया उमटल्या. परंतु काही महिन्यांपूर्वी शिवसेना युवा सेनेच्यावतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहूमधील अधिश निवासस्थानावर मोर्चा काढत हल्ला केला. परंतु अशाप्रकारे नेत्यांच्या घरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भाच्याला पुढे करून केला होता. हा पायंडा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घातला होता. तोच पायंडा शुक्रवारच्या आंदोनालनातून दिसून आला, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली.

( हेही वाचा : हल्लाच करायचा होता तर ‘मातोश्री’वर करायचा होता..दिलीप मोहितेंचे वक्तव्य )

घरावर हल्ला करण्याचा पायंडा

एसटी कामगारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी मोर्चा काढत हल्ला केल्यानंतर सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना, नेत्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबांच्या घरावर हल्ला करण्याचा पायंडा महाराष्ट्राने कधीच पाडलेला नसल्याचे सांगितले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असला प्रकार कोणाच्याच बाबतीत घडता कामा नये, ही आपल्या महाराष्ट्राची शिकवण असल्याची प्रतिक्रिया दिली होती. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, महाराष्ट्राचे कधीही एवढे राजकारण झाले नव्हते, असे सांगितले.

मागील वर्षी जुहू येथील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानावर शिवसेना युवा सेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये आक्रमक झालेल्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच युवा सैनिकांना निवासस्थानावर दगडफेकही केली होती. शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्यानंतर पुन्हा त्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

…तेव्हा बाकी सर्व कोकणात होते

यासंदर्भात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी हिंदुस्थान पोस्टला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये नेत्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या घरावर हल्ला करण्याचा पायंडा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पाडलेला असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अशाप्रकारचा पायंडा महाराष्ट्राने कधीच पाडला नसल्याचे प्रतिक्रिया व्यक्त केली असली तरी जुहू येथील राणे कुटुंबांच्या अधिश बंगल्यावर मोर्चा काढत कुणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता? युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाईला पुढे करून कोणी मोर्चा काढायला लावला होता त्यात मुख्यमंत्र्यांची भूमिका काय होती असा सवाल नितेश राणे यांनी केली. या हल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हल्लेखोरांचे नेतृत्व करणाऱ्यांना शाबासकीची पाठ थोपटली ही अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे जो पायंडा मुख्यमंत्र्यांनी पाडला, तोच पायंडा शुक्रवारच्या शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याने दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी घरामध्ये माझी आई वडिल आणि मुलगी आहे. त्यांची आधी सुरक्षा मला पाहू द्या असे सांगत त्यांनी आंदोलकांसह प्रसारमाध्यमांना विनंती केली. परंतु राणे कुटुंबांच्या घरावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा घरामध्ये दोन लहान मुले आणि दोन महिला होता. बाकी सर्व कोकणात होते. कोकणात असताना अशाप्रकारे भ्याड हल्ला केल्याने घरातील महिला व मुले घाबरली होती. परंतु त्यावेळेला कुणीही अशाप्रकारे नेत्यांच्या व त्यांच्या कुटु बांच्या घरांवर हल्ला करू नये अशाप्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे शरद पवार यांच्या घरांवर हल्ला झाल्यानंतर हल्लेखोरांवर कारवाई करायला हवी असे सांगणारे अजित पवार हे राणे कुटुंबांच्या घरांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करणार का असाही सवाल त्यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.