ठाकरे सरकारसाठी पुढचे सहा महिने धोक्याचे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचा दौरा करत असून, राज्यातील जनतेची काय मानसिकता आहे याचा आढावा घेत आहेत.

राज्यात ठाकरे सरकार येऊन आता जवळपास दीड वर्ष झाले, या दीड वर्षात बरेच आरोप ठाकरे सरकारवर झाले. ठाकरे सरकारमधील दोन मंत्र्यांना राजीनामे देखील द्यावे लागले. तरी देखील विरोधकांच्या मनासारखे होताना दिसत नाही. सरकार आज पडेल उद्या पडेल, अशी स्वप्ने रंगलेली असताना ठाकरे सरकार अजूनही स्थिर आहे. सरकार स्थिर असले तरी त्याचा अडचणींचा सामना काही थांबलेला नाही. त्यातच आता पुढचे आणखी सहा महिने सरकारसाठी धोक्याचे असल्याचे बोलले जात आहे. नेमके हे सहा महिने का धोक्याचे असतील, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट!

आरक्षणाचा मुद्दा पेटणार?

राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना भविष्यात या दोन्ही आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे. तशी तयारीच विरोधकांनी केली असून, विरोधकांनी तसे मनसुबे रचायला सुरुवात केली आहे. आजपासून ओबीसी आरक्षणासाठी भाजप रस्त्यावर उतरले आहे. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आरक्षणावरून ठाकरे सरकारला जेरीस पकडण्याची रणनीती आखली आहे. याचा ते सध्या राज्यातील काही भागांचा दौरा करत असून, राज्यातील वातावरणाचा अंदाज घेत आहे. एवढेच नाही तर गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आज लोकनेते, जननायक गोपीनाथ मुंडे असते, तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत या सरकारची झाली नसती, अशा शब्दांत ठाकरे सरकारवर टीका केली. भविष्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून भाजप रस्त्यावर उतरण्याची तयारी देखील करत असून, दोन्ही समाजातील नेत्यांनी तसे संकेत दिले. त्यामुळे येणारा काळ ठाकरे सरकारसाठी कोरोनासोबतच आरक्षणाचा मुद्दा देखील डोकेदुखी ठरणार आहे.

(हेही वाचा : शिवसेनेचे ‘ते’ सध्या काय करतात?)

मानगुटीवर आरोपांचे भूत 

ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर सातत्याने आरोप होत आहेत. यामध्ये सगळ्यात पुढे हे उद्धव ठाकरे यांचे सर्वात जवळचे आणि परिवहन मंत्री असून, ते सध्या विरोधकांच्या रडारवर आहेत. आरटीओमधील वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात नाशिकमधील पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. आरटीओ खात्यात पदोन्नतीसाठी आणि इतर व्यवहारात भ्रष्टाचार होतो, असा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. अधिकाऱ्यांच्या मदतीने ३०० कोटी रुपयांचा ट्रान्सफर पोस्टिंग घोटाळा केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे भविष्यात हे प्रकरण गाजण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर अनिल परब यांनी लॉकडाऊन काळात शेतजमिनीवर रिसॉर्टचे बांधकाम करुन, फसवणूक केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर आता या प्रकरणाच्या तपासाने देखील वेग पकडला असून, यामुळे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडचणीत येऊ शकतात. तर सध्या अनिल देशमुख प्रकरणाचा देखील तपास सुरु आहे. त्यामुळे पुढच्या सहा महिन्यात या दोन्ही नेत्यांवरील आरोपाचे भूत मानगुटीवर असेल.

अंतर्गत हालचाली वाढल्या

नुकतीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिल्व्हर ओकवर जात शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट जरी सदिच्छा भेट म्हटली जात असली तरी काही तरी आतमध्ये शिजत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस हे राज्याचा दौरा करत असून, राज्यातील जनतेची काय मानसिकता आहे याचा आढावा घेत आहेत. एकूणच सर्व हालचाली पाहिल्या तर राज्यात पुढील सहा महिन्यात पुलाखालून बरेच पाणी जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे पुढचे सहा महिने ठाकरे सरकारसाठी कसे असणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here