मंत्रालयासमोर आंदोलन करणाऱ्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल करा! नितेश राणेंनी का केली मागणी?

131

राष्ट्रवादीचे प्रवक्ते, मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. या कारवाईच्या विरोधात महाविकास आघाडीचे नेते, आमदार आणि मंत्री यांनी मंत्रालयासमोर महात्मा गांधी यांच्या पुतळाच्या खाली निदर्शने केली. त्याचा आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आक्षेप घेतला आहे.

मंत्रालयासमोरील भाग संवेदनशील 

दक्षिण मुंबई हा भाग आंदोलनासाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून ठरवण्यात आला आहे. त्यातही मंत्रालयासमोरील भाग अधिक संवेदनशील समजला जातो. त्यामुळे अधिवेशनासह अन्य कोणत्याही वेळी कुणालाही मोर्चे, निदर्शने करायची असतील, तर त्यांना मंत्रालय परिसरात करता येत नाही. या सर्वांसाठी आझाद मैदान हे ठिकाण ठरवण्यात आले आहे. ठाकरे सरकारने नवाब मलिकांसाठी हा नियम बासणात गुंडाळून ठेवला आणि नवाब मलिकांवरील कारवाईचा निषेध करण्यासाठी मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याखाली निदर्शने केली.

(हेही वाचा ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी मलिकांसाठी मोडला ‘हा’ नियम!)

मंगल प्रभात लोढा यांच्यावरही झालेली कारवाई 

त्याविरोधात आमदार नितेश राणे यांनी आक्षेप घेत आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. राणे यांनी मरीन लाईन पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. ज्या ठिकाणी आंदोलन केले आहे, तो भाग असंवेदनशील आहे. याआधी भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनीही या ठिकाणी आंदोलन केले होते, त्यावेळी त्यांच्यावर भा.दं.वि. १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, याउलट महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेते यांनी आंदोलन केले तरी त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असा प्रश्न आमदार राणे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राणे यांनी केली आहे.

कोण करत होते निदर्शन? 

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक, नगरसेवक कप्तान मलिक,सलील देशमुख, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा या आंदोलनात सहभाग होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.