ठाकरे सरकारचा उफराटा कारभार! शेतकरी, एसटी कामगार उपाशी, सी-लिंकवर दिव्यांची विद्युत रोषणाई

102

सध्या ठाकरे सरकारचे काय सुरू आहे, हे सरकारलाच कळत नाही, अशी स्थिती आहे. एका बाजूला राज्यात गोरगरीब कष्टकरी जनता, शेतकरी, एसटी कामगार, असंघटित कामगार हे दोन वेळच्या अन्नासाठी झगडत आहे, सरकार त्यांना पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत आहे, मात्र त्याच वेळी ख्रिसमस आणि इंग्रजी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सी लिंक वर विद्युत रोषणाई करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत आहे.

एसटीचे कामगार उपाशी

मागील दोन महिन्यांपासून राज्यातील राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी विलनिकरणाच्या मुद्द्यावरून संपावर आहेत. दर महिन्याच्या वेतनासाठी करावा लागणाऱ्या संघर्षाला कंटाळून कर्मचाऱ्यांनी अखेर सरकारमध्ये विलीन करण्याची मागणी केली आहे, मात्र इतक्या संख्येने कर्मचाऱ्यांना सरकारमध्ये विलीन करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही, असे कारण देत सरकार अडून आहे. तसेच मागील ४ वेतन वाढीचे करार देखील रखडवून ठेवले आहेत, त्या ठाकरे सरकारला सी लिंक वरील विद्युत रोषणाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च करायला कसा पैसा मिळाला आहे, असा सवाल आता विचारला जात आहे.

यासंबंधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांना विचारले असता त्यांनी सी लिंकवर करण्यात आलेली विद्युत रोषणाई ही ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असून ती ३ जानेवारीपर्यंत राहणार आहे. स्वयंसेवी संस्थांनी आमच्याकडे ही विद्युत रोषणाई करण्यासाठी अर्ज केला होता, त्याप्रमाणे त्यांनी ही रोषणाई केली आहे, असे सांगितले.

शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या तोडणार, पण सी लिंकवर वीज वाया घालवणार

राज्यात मागील २ वर्षे कोरोनाचा कहर आहे. त्यातच लहरी हवामान यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. परिणामी राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे वीज बिल थकलेले आहे. त्यात सुट द्यावी किंवा ते माफ करावे अशी मागणी होत आहे. मात्र ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज फुकट येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना वीज बिल भरावेच लागेल, अन्यथा त्यांची वीज जोडणी तोडावी लागेल, असे सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात बोलताना म्हणाले. एका बाजूला गरीब शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याच्या मागणीवर वीज फुकट येत नाही, असे सांगणारे ठाकरे सरकार सी लिंक वरील विद्युत रोषणाईवर मात्र हजारो युनिट वीज वाया घालवत आहे.

ठाकरे सरकारच्या या उधळपट्टीवरून जनमानसात संतापाची लाट उसळली आहे. सरकारचा हा उफराटा कारभार जनक्षोभ उसळण्यास कारणीभूत ठरणार, अशी शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.