मला ठार मारण्याचा सरकारचा कट होता! नितेश राणेंचा गौप्यस्फोट

112

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माझ्यावर ३०७ कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केले होते. त्यावेळी मला कोल्हापुरात सरकारी रुग्णालयात दाखल केले होते, त्यावेळी माझी अँजिओग्राफी करण्यास डॉक्टर म्हणाले होते, त्यावेळी मला काही डॉक्टरांनी याला नकार द्या, यामाध्यमातून तुमच्या शरीरात विषप्रयोग करण्याचा डाव आहे, असे सांगितले होते. अशा प्रकारे आपल्याला ठार करण्याचा डाव ठाकरे सरकारचा होता, विरोधकांना संपवून टाकणे म्हणजे ठाकरे सरकार!, अशा शब्दांत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना केला.

खोटे साक्षीदार बनवून अटक करण्याचे कारस्थान 

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत लोकप्रतिनिधीला कशी वागणूक दिली जाते, हे या सभागृहाने गांभीर्याने घेतले पाहिजे. आपली प्रकृती खालावली होती, त्यामुळे कोल्हापुरात रुग्णालयात दाखल केले, तेव्हा रात्री अडीच वाजता आपल्याला डिस्चार्ज देऊन कारागृहात टाकण्यासाठी ३०० पोलीस आले. त्यावेळी पोलिसांना कलानगर येथून वारंवार त्यांना फोन येत होते, असेही आमदार राणे म्हणाले. ज्याला मारहाण केली म्हणून आपल्यावर कलम ३०७चा गुन्हा दाखल झाला, तो परब दुसऱ्या दिवशी गावभर फिरत होता. माझ्याविरोधात साक्षीदाराला स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकला जात होता, त्यावेळी पोलीस अधिकारी म्हणत होते वरून दाबत आहे.

(हेही वाचा आमदारांसाठी 300 घरे बांधणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा)

पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासा 

दिशा सालियन प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मी काही आरोप केले, त्यावेळी दिशांच्या आई-वडिलांना आपल्याविरोधात गुन्हे दाखल करायला लावले, महिला आयोगानेही ताबडतोब याची दखल करून केस दाखल केली. आम्हाला मालवणी पोलीस ठाण्यात ९ तास बसवून ठेवले, त्यावेळी एकही प्रश्न विचारला नाही. प्रत्येक १५ मिनिटांनी डीसीपींना फोन यायचा. मुंबई महानगर पालिकेला आता काही काम राहिले नाही, जणू काही सर्व प्रश्न संपले आहेत. आयुक्तांना काही काम उरले नाही, फक्त विशिष्ट लोकांच्या घरांचे बांधकाम किती वाढले आहे, हेच पाहण्याचे त्यांचे काम राहिले आहे. त्यांना विचारले तर सांगतात वरून आदेश आले आहेत. वरून आदेश कोण देतात? १२ वर्षानंतर महापालिकांना आमच्या घरांमध्ये वाढीव बांधकाम झाल्याचे दिसते, ते म्हणतात वरून आदेश आहेत, त्यामुळे अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासले पाहिजे, असेही आमदार राणे म्हणाले.

रझा अकादमीवर सरकारचा आशीर्वाद

१२ नोव्हेंबर २०२१ रोजी राज्यभरात काही ठिकाणी मोर्चे काढले, कोणीही कोविड नियमांचे अवलंब केले नव्हते, मुसलमान वर्षभर हैदोस घालतात, भिवंडी, नांदेड, मालेगाव येथे दंगल करतात, त्यात रझा अकादमीचे नाव येते, पण या सरकारचे त्यांना आशीर्वाद आहेत, एसटी कर्मचारी ३ महिन्यांपासून संपावर आहेत, त्यांचे निवेदन घेण्यासाठी कुणी नायब तहसीलदार गेला नाही, पण याच रझा अकादमीच्या मोर्च्यावेळी नायब तहसीलदार व्यासपीठावर जाऊन त्यांचे निवेदन स्वीकारत आहे, त्यानंतर दंगल झाल्या. त्यांच्यावर कारवाई कधी करणार? आझाद मैदान दंगलीत पोलिसांना मारहाण झाली, भिवंडीच्या मोर्च्यातही पोलिसांना मारले त्या संघटनेवर बंदी आणण्याचा प्रस्ताव केंद्रात पाठवण्याची जबाबदारी सरकारची नाही का, फक्त विरोधी पक्षांना कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अडकवण्याचे काम सरकार करत आहे, असेही आमदार राणे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.