पैशाच्या ‘मोहा’पायी ठाकरे सरकारने उठवली चंद्रपूरमधील दारुबंदी !

चंद्रपूर जिल्ह्यात 1 एप्रिल 2015 पासून संपूर्ण जिल्ह्यात दारुबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. फडणवीस सरकारमधील चंद्रपूरचे तत्कालीन पालकमंत्री, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने हा दारुबंदीचा निर्णय घेण्यात आला होता.

175

चंद्रपूरमध्ये असलेली दारुबंदी ठाकरे सरकार उठवणार, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु असताना अखेर ठाकरे सरकारने दारुबंदी उठवण्याचा निर्णय गुरुवारी, २७ मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला. सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधाला न जुमानता सरकारने हा निर्णय घेतला. कारण गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूरमधील दारुबंदी कायम ठेवावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते आक्रमक होते, मात्र राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा मात्र  दारुबंदीला विरोध होता. 

काय म्हणाले वडेट्टीवार?

दारुबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विकली जात होती. दारुबंदी उठवावी याकरता अडीच हजार निवेदने आली होती. अवैद्य आणि डुप्लिकेट दारु जिल्ह्यात विकली जात होती. त्यामुळे दारुबंदीचे दुष्परिणाम दिसू लागले होते. यासंदर्भात एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीने दारुबंदी उठवावी यासंदर्भात अहवाल दिला होता. हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला होता.

(हेही वाचा : राज्यात लॉकडाऊन कायम राहणार! पण…)

विरोधकांची सराकरवर टीका

दरम्यान राज्य सरकारने दारुबंदीचा उठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी हे सरकार आल्यापासून वेगवेगळ्या विषयांना थांबवणे आणि ज्या वाईट गोष्टी आहेत. त्या चालू ठेवण्याचे काम करत आहे. हीच या सरकारची मानसिकता दिसते. दारुने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. तरुण पिढी बरबाद होते. दारुसाठी हे सरकार आले आहे का? हे सरकार तरुण पिढीला व्यसनाधीनतेकडे घेऊन जाणार आहे का?, असाही सवाल दरेकर यांनी विचारला आहे.

चंद्रपुरातील दारुबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरमागी परिणामी होतील. राज्य मंत्रिमंडळाने आज या संदर्भातील निर्णय घेतला. कोरोना काळात राज्यातील आरोग्याच्या स्थितीवर लक्ष देणे सोडून महाविकास आघाडी सरकारच्या प्राथमिकता काय आहेत, हेच या निर्णयातून दिसून येते. त्यामुळेच हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे.
– देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा 

फडणवीस सरकारचा होता निर्णय!

चंद्रपूर जिल्ह्यात 1 एप्रिल 2015 पासून संपूर्ण जिल्ह्यात दारुबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. विशेषतः यासाठी फडणवीस सरकारमधील चंद्रपूरचे तत्कालीन पालकमंत्री, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने चंद्रपूरमध्ये दारुबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर मागील 6 वर्षांत (फेब्रुवारी-2021 पर्यंत) तब्बल 118 कोटी 31 लाख 99 हजार 438 रुपयांची अवैध दारु पोलिसांनी पकडली. 47 हजार 362 दारु तस्करांना अटक केली. त्यामुळेच ही अवैध दारु रोखण्यासाठी आता सरकारने दारुबंदी उठवण्याच निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.