ठाकरे सरकार टिकून राहावे ही राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा!

काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जो बहुमान मिळाला नाही, तो मान ठाकरे सरकारमध्ये मिळत आहे.

83

राज्यातील ठाकरे सरकार कोणत्याही क्षणी कोसळेल, अशा शक्यता वर्तवल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात ठाकरे सरकार टिकावे ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच इच्छा आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून स्वबळाचा नारा देत अधूनमधून ठाकरे सरकारला धक्का देण्याचा प्रयत्न होत असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच काँग्रेसला अस्तित्वाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न होत आहे. ठाकरे सरकार विरोधात असहकार म्हणजे भाजपला मदत, असे काँग्रेसच्या मनावर बिंबवून जे पुढच्या दहा वर्षात मिळाले नाही ते पाच वर्षात आपल्याला मिळाले असून त्यामुळे ठाकरे सरकार टिकवण्यातच आपल्या दोन्ही पक्षाची भलाई असल्याचा कानमंत्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसला दिला जात असल्याचे बोलले जात आहे.

सरकार पाडण्याची इच्छा हवेत विरली!  

राज्यातील भाजप-शिवसेना युतीचे राज्य जावून २०१९मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार आले. या सरकारचे नेतृत्व खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी करून त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली. त्यानंतर हे सरकार आज पडेल, उद्या पडेल अशाप्रकारच्या तारीख पे तारीखचा खेळ सुरु आहे. पण सरकार आहे तिथेच आहे. एका बाजुला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांभोवती ईडीचा फास आवळला जात आहे, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी वाढू लागल्या आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा शिवसेना भाजप युतीची चर्चा रंगू लागली.

(हेही वाचा : पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी, भाजपची मदत थोडी, प्रसिद्धी मात्र मोठी!)

राष्ट्रवादीला मिळतोय ठाकरे सरकारमध्ये बहुमान!

या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील ठाकरे  सरकार पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करेल. राज्यात काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जो बहुमान मिळाला नाही, तो मान ठाकरे सरकारमध्ये मिळत आहे. त्यामुळे ठाकरे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना साथ देईल. यापूर्वीच्या आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस व इतर घटक पक्षांचे सरकार होते. पण त्या सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकावरील पक्ष जरी राष्ट्रवादी असला तरी त्या सरकार आणि या सरकारमधील तुलना करता आपल्या पक्षाचे मंत्री मनमोकळेपणाने काम करत आहे. त्यांच्यावर कोणतेही दडपण नाही. त्यांना आपल्या मंत्रीपदाला न्याय देता येत आहे. त्यातच राज्यात काँग्रेसपेक्षा अधिक आमदार निवडून आल्याने एकप्रकारचा विश्वास वाढलेला आहे. त्यामुळे राज्यातील आमदारांची संख्या वाढवून काँग्रेसपेक्षा अधिक आमदार निवडून आणण्यावर पक्षाचा कल राहणार आहे. म्हणून ठाकरे सरकार कायम टिकून राहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वप्न साकार होवू शकते, असे त्यांना वाटत आहे.

जे दहा वर्षात मिळाले नाही ते राष्ट्रवादीला ठाकरे सरकारमध्ये मिळाले! 

मध्यंतरी काँग्रेसने स्वबळाची घोषणा केल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे कान टोचल्याचीही माहिती मिळत आहे. देशात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने आपल्याला दहा वर्षात सत्ता मिळणार नव्हती. परंतु भाजपला बाजुला सारण्यासाठी शिवसेनेला सोबत घेवून आपण महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. जे आपल्याला दहा वर्षात मिळणार नव्हते, ते आपण पाच वर्षात मिळवले आहे. त्यामुळे जे मिळाले ते किमान पाच वर्षे टिकवून ठेवा आणि पाच वर्षानंतर आपला रंगरुप दाखवा. पण सध्या ठाकरे सरकारला धक्का बसेल असे वर्तन करू नका. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला भाजपला सत्तेपासून लांब ठेवायचे आहे. म्हणून आपण कोणतेही वाकडे पाऊल उचलल्यास त्याचा फायदा भाजपला होईल आणि सध्या जे काही पक्षाच्या ताटात वाढून ठेवले आहे ते जाईल, अशा शब्दांत काँग्रेसची समजूत घातली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच काँग्रेसचा सूर आता बदलू लागल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.