ठाकरे सरकारने निर्बंधाचा नवीन धंदा सुरू केला आहे. वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात, जिथे घाटा आहे तिथे निर्बंध कडक राहतात म्हणून रेस्टॉरंटवाले, बारवाले भेटले “वाटघाटी” झाल्या. तर दुसरीकडे घाट्यात असलेले मराठी कलावंत, नाटक कलावंत, मराठी लोक कलावंत, धूप कापूर विकणारे घाट्यात आहेत, वाटाघाटी करू शकत नाहीत, वाटा देऊ शकत नाहीत, म्हणून त्यांच्यावर निर्बंध लादले गेले आहेत. त्यांची उपासमार सुरू आहे, हा वाटाघाटीचा धंदा बंद करा, आता गणेशोत्सव, नवरात्र मंडळांसोबत पण शिवसेना वाटघाटी करणार का? असा सवाल करत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.
…नाहीतर आम्ही नाव जाहीर करू
राज्यातील थिएटर सुरू करण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीतला एक राज्यसभा सदस्यांचा जावई सरकारच्यावतीने वाटाघाटी करतो आहे. वाटाघाटी करा मग निर्बंध शिथिल करू, असा धंदा सुरू आहे. शिवसेनेच्या राज्यसभा सदस्याच्या जावयाने हे धंदे बंद करावेत, अन्यथा आम्ही नाव जाहीर करू असा गर्भित इशारा ही यावेळी आमदार आशिष शेलार यांनी दिला.
(हेही वाचाः परप्रांतीय फेरीवाले मनसेच्या रडारवर! राज ठाकरेंनी घेतली कल्पिता पिंपळेंची भेट)
गोविंदा काय लादेन आहे का?
गोविंदाला नोटीस काय, धरपकड काय, बळाचा वापर काय, अटक काय, या सगळ्या गोष्टी मंगळवारी दिवसभरात महाराष्ट्रात आणि मुंबईत घडल्या. हा सुलतानी पद्धतीचाच कारभार म्हणावा लागेल. म्हणून मुख्यमंत्री महोदयांना आम्ही आठवण करुन देतो, ज्यावेळी सचिन वाझेचा प्रश्न सभागृहात आम्ही मांडला, करोडोंची वसुली केल्यानंतर ज्यावेळी आम्ही प्रश्न उपस्थित केला, तर तुम्ही म्हणाला होतात की सचिन वाझे लादेन आहे काय? म्हणून आज आमचा सवाल आहे तुम्हाला, हे गोविंदा काय लादेन आहेत काय? ज्या पद्धतीने बळाचा वापर करुन केसेस टाकताय म्हणून हा सवाल आम्ही तुम्हाला विचारतोय.
राज्याला बंदीवान करण्याचा रेकॉर्ड
गेल्या दिड पावणे दोन वर्षांमध्ये ठाकरे सरकारने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. पावणे दोन वर्षांत महाराष्ट्राला बंदीवान केल्याचा रेकॉर्ड हा उद्धव ठाकरे यांच्या नावावर लिहिला जाईल, असे दुर्दैवी चित्र आहे. मुख्यमंत्री म्हणतात आमचा सणांना विरोध नाही, कोरोनाला विरोध आहे. गर्दी जमू नये असे वाटते तर मग मुंबईतले, राज्यातले रेस्टॉरंट, बार, पब, येथे जमणाऱ्या गर्दीचे काय? असा सवाल शेलार यांनी केला आहे.
(हेही वाचाः मनसेकडून मुख्यमंत्र्यांना कमिशनर रँडची उपमा! )
75 वेळा एक वाक्य म्हणावे
2019 पर्यंत शिवसेनेची घोषणा होती, “पहले मंदिर बादमें सरकार” तर 2021ला शिवसेनेची घोषणा बदलली आणि “पहले मदिरालय बाद मे मंदिर!” अशी झाली आहे, असा सणसणीत टोला आशिष शेलार यांनी लगावला. स्वतंत्रता आंदोलनाबद्दल तर मुख्यमंत्र्यांनी बोलूच नये, अगोदर ‘हा भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे..’ हे वाक्य 75 वेळा बोलावे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
संजय राऊत यांना अंतर्गत धोका असवा
संजय राऊत यांची सुरक्षा वाढवण्यात आली हे चांगले आहे. ते नेते आहेत, संपादक आहेत. नेहमी पुढे बोलताना दिसतात, त्यामुळे पक्ष कोण चालवतो हेही दिसतंय. बहुतेक त्यामुळेच त्यांना बाहेरुन नाही तर अंतर्गत धोका जास्त असावा म्हणून त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली असावी, अशी कानपिचक्या शेलारांनी दिल्या.
(हेही वाचाः संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ! )
Join Our WhatsApp Community