कार्यालयांत पोहचायला ‘शिव पंख’ द्या! लोकल प्रवासावरून मनसेचा टोला

मुंबईत रुग्ण संख्या घटली आहे. मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी सुरु केला नाही.

राज्य सरकारने अनलॉक प्रक्रियेअंतर्गत मुंबईत सर्व खासगी कार्यालयांना सुरू करण्यास मुभा दिली आहे, दुकाने १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे, मात्र लोकल प्रवास सर्व सामान्यांना खुला केला नाही. त्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खास शैलीत टीका केली.

काय म्हणाले देशपांडे?

सी.एम. साहेब आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार.लोकल बंद आहेत. बसला प्रचंड वेळ लागतो, गर्दीही असते. आपल्याला विनंती आहे या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण “शिव पंख लावून दिलेत, तर त्यांना कामावरही जाता येईल आणि त्रास पण नाही. मला खात्री आहे आपण हे करू शकता. आमचा सीएम जगात भारी!

सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजी! 

सध्या कोरोनासंबंधी निर्बंध राज्यभर लावण्यात आले आहेत, सोमवारी राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम ठेवले आहेत, तर २५ जिल्ह्यांमध्ये थोडे कमी केले आहेत. मुंबईत रुग्ण संख्या फारच घटली आहे. मात्र मुंबईत दररोज अन्य जिल्ह्यांमधून मोठ्या संख्यने जनता येत असते त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी सुरु केला नाही, त्यामुळे जरी मुंबईत रुग्ण संख्या कमी असली तरी लोकल प्रवास पूर्णतः सुरु केला नाही. त्याबाबत मात्र मुंबईकरांमध्ये नाराजीचा सूर आहे. जरी कार्यालये सुरु झाली असली, दुकाने सुरु झाली असली तरी प्रवास कसा करायचा, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. तर बसगाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होते, त्यामधून कोरोना वाढणार नाही का, असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत.

(हेही वाचा : राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये निर्बंध झाले शिथिल! असे आहेत नवीन नियम)

आज रेल्वे प्रवाशांचा मोर्चा!

गरीब, कष्टकरी, खाजगी नोकरदार वर्गाचा रेल्वे प्रवास बंद आहे, गेल्या तीन महिन्यांपासून कर्जत, कसारा, पनवेल व विरारवरुन येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. आता त्यांना कुटुंबांसह आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. फेबुवारी २०२१ रोजी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाच्या पाठपुराव्याने लोकल सेवा चालू झाली होती. त्यामुळे यंदाही पुन्हा लोकल सर्वसामान्यांसाठी खुला करावा, याकरता मंगळवार, ३ ऑगस्ट रोजी सर्वानी मध्य रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापकांच्या कार्यालयावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे दुपारी ३ वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अभिजीत धुरत यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here