पाडकाम केलेले कार्यालय अनधिकृत नव्हते. किरीट सोमय्यांनी बिल्डरांकडून सुपारी घेतली आहे, असा आरोप ठाकरे गटाचे अनिल परब यांनी केला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तसेच, कार्यालयाचे पाडकाम पाहायला वांद्रे येथे येणा-या किरीट सोमय्या यांना अनिल परब यांनी आव्हान दिले. त्यांना इथे यायचे असेल तर पोलिसांनी त्यांना अडवू नये, त्यांनी इथे यावे, आम्ही त्यांचे स्वागत करायला तयार आहोत. त्यांनी शिवसैनिकांचा पाहुणचार अनुभवावा, असे अनिल परब म्हणाले. तर किरीट सोमय्यांना पोलिसांनी बीकेसीमध्येच रोखले आहे. संभाव्य वादाची परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी खबरदारी म्हणून किरीट सोमय्यांना अनिल परब यांच्या निवासस्थानी जाण्यापासून अडवले.
काय म्हणाले अनिल परब?
म्हाडा आणि या इमारतीमधील रहिवासी म्हणून मी आज बोलत आहे. या इमारतीत माझा जन्म झाला. आता या इमारती म्हाडाच्या राहिल्या नाहीत. सोसायटीची जागा मला वापरायला दिली होती. मी मंत्री झाल्यावर सोमय्यांनी म्हाडाच्या लोकायुक्तांकडे जाऊन हे कार्यालय अनधिकृत असल्याचे सांगितले. यावर म्हाडाने मला नोटीस दिली, त्याला मी उत्तर दिले. ही जागा माझी नाही यासंदर्भात मी स्पष्टीकरण दिले. मी फक्त जागा वापरत होतो. त्यानंतर म्हाडाने नोटीस मागे घेतली. परंतु रेग्युलायझेशनचा अर्ज म्हाडाने फेटाळला कारण त्यांच्यावर सोमय्यांनी दबाव टाकला, असा आरोप परब यांनी केला आहे.
( हेही वाचा: ‘इतर देशांवर अवलंबून असलेला भारत आज मोठी अर्थव्यवस्था बनलाय’; राष्ट्रपतींकडून कौतुक )
सोमय्यांना पोलिसांनी बीकेसीजवळ रोखले
म्हाडाच्या काॅलनीमधील अनिल परब यांचे अनधिकृत कार्यालय तोडले. हे पाडकाम पाहण्यासाठी किरीट सोमय्या वांद्र्याच्या दिशेने रवाना झाले होते. परंतु अनिल परब यांच्या घराजवळ शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. किरीट सोमय्या इथे दाखल झाले तर अनुचित प्रकार किंवा संघर्ष होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी त्यांना बीकेसी येथे अडवले.
Join Our WhatsApp Community