तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे गटाला टोला लगावला आहे. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असून, सरकार तेच चालवत असल्याचे राऊत यांनी म्हटले. सरकारने काही निर्णय चांगले घेतले असून विरोध करायचा म्हणून विरोध करणार नसल्याचेही राऊत यांनी म्हटले. तीन महिन्यानंतर तुरुंगातून सुटका झाल्यानंतर लोकांनी स्वागत केले, प्रेम व्यक्त केले. लोक मला विसरली असतील असे वाटले होते. मात्र, त्यांनी माझे स्वागत केले.
( हेही वाचा: परबांच्या अडचणीत वाढ; दापोली पोलीस बजावणार समन्स )
फडणवीसांच्या वक्तव्याचे स्वागत
संजय राऊत यांची बुधवारी संध्याकाळी तुरुंगातून सुटका झाली होती. त्यानंतर त्यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, न्यायालयाच्या निर्णयावर टिप्पणी करणार नाही. न्यायालयाच्या आदेशाने देशात मोठा संदेश गेला आहे. माझ्या मनात कोणाविरोधात राग नाही. माझ्याविरोधात कारस्थान करणा-यांना आनंद वाटत असेल तर त्यांच्या आनंदात सहभागी आहे, असेही त्यांनी म्हटले. या सरकारला विरोधाला विरोध करणार नाही. काही निर्णय चांगले घेतले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाला परत अधिकार दिले आहेत. आमच्या सरकारने हे अधिकार काढले होते. असे काही चांगले निर्णय सरकारने घेतले असल्याचे सांगत राज्य सरकार उपमुख्यमंत्री चालवत असल्याचे त्यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय कटुता संपवण्याबाबत वक्तव्य केले होते. त्याचेदेखील स्वागत करत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community